रंगनाथ स्वामी पतसंस्थेत कर्मचारी भरतीत मोठा भ्रष्टाचार

पत्रकार परिषदेत विद्यमान अध्यक्षांवर एड. भास्कर ढवस यांचा घणाघात , शेतकऱ्याना अल्पदरात कर्ज देण्याचे परिवर्तन पॅनलचे आश्वासन

बहुगुणी डेस्क : रंगनाथ स्वामी नागरी पतसंस्थेच्या 17 संचालकासाठी उद्या रविवार 26 जून रोजी सकाळी 8 वाजता पासून मतदान होणार आहे. दरम्यान निवडणुकीत उभे असलेले परिवर्तन पॅनलचे ऍड. भास्कर ढवस यांनी पत्रकार परिषद घेऊन रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्षांवर गंभीर आरोप केले. गरज नसताना यवतमाळ, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात फक्त आपल्या हितासाठी पतसंस्थेच्या शाखा उघडण्यात आल्या. या शाखांमध्ये कर्मचाऱ्यांची भरती करताना अध्यक्ष व काही संचालकानी लाखो रुपयांची आर्थिक उलाढाल केल्याचा घणाघात यावेळी ऍड. ढवस यांनी केला. संस्थेने 3 कोटी 15 लाख किमतीत खरेदी केलेले रंगनाथ चेंबर्स व शेवाळकर परिसरात 3 कोटी 30 लाखांचे प्रशासकीय कार्यालय खरेदीतही संचालकांचे हात ओले असल्याचा आरोप त्यांनी केला.

रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे अध्यक्ष तानाशाही प्रवृत्तीचे असून ते इतर संचालकाचे म्हणणे ऐकत नसल्याचा दावा ऍड. ढवस यांनी केला. काही संचालकाचा विरोध असताना विद्यमान अध्यक्ष यांनी एकाच व्यक्तीला स्वतःच्या नावाने, मित्राच्या नावाने, कामगाराच्या नावाने 70 कोटी रुपयांचा कर्ज दिल्याचा खुलासाही त्यांनी केला. गोरगरिबांच्या हितासाठी सुरु करण्यात आलेली ही संस्था आता धनाढ्य लोकांच्या हाताची कठपुतली झाली आहे. असाही आरोप ऍड. भास्कर ढवस यांनी केला

या निवडणुकीत पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष ऍड. देविदास काळे यांचे जय सहकार पॅनल समोर माजी आमदार वामनराव कासावार समर्थीत परिवर्तन पॅनेलने मोठे आव्हान उभे केले आहे. दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांनी संस्थेचे सभासद असलेल्या मतदारांचे मत मिळण्यासाठी कसर ठेवली नाही. मात्र आजची रात्र उमेदवारांसाठी कतलीची रात्र ठरणार आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जावर व्याज दर कमी करणार
रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळावर परिवर्तन पॅनलचे संचालक निवडून आल्यास शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जावर व्याज दर कमी करण्याचा काम आम्ही करणार. तसेच पतसंस्थेच्या अभिकर्त्यांसाठी विमा व सुरक्षा योजना राबविणार. पतसंस्थेचा कारभार पारदर्शक राहण्यासाठी आम्ही सर्वोतोपरी प्रयत्न करणार.
ऍड. भास्कर ढवस, उमेदवार परिवर्तन पॅनल

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!