विवेक तोटेवार, वणी; तालुक्यामध्ये शाळा महाविद्यालयाचे निकाल जाहीर झाले. त्यामुळे आता वरच्या वर्गातील प्रवेशासाठी पालक धडपड करताना दिसत आहे. यासोबतच पालकांची शिकवणी वर्गासाठीचीही धडपड सुरू आहे. जर शिकवणी वर्गात आपल्या पाल्याला शिक्षण घ्यावे लागत असेल तर शाळा, महाविद्यालयाची आवश्यकता काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सर्वांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यासाठी सरकारने ‘सर्व शिक्षा अभियान ‘ही योजना आणली. परंतु या शिक्षणावर पालकांचा किती खिसा कापला जात आहे याकडे आता सर्वांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे. नगर परिषदेच्या शाळेची तर अवस्था फार बिकट आहे. त्यांना मुलांच्या शोधात राहावे लागते. परंतु शिक्षणाचा दर्जा मात्र शून्य असल्याने कोणतेही पालक आपल्या पाल्याला चांगले शिक्षण देण्यासाठी खासगी इंग्रजी शाळेतच प्रवेश घेणे पसंत करीत आहे.
खाजगी शाळेत प्रवेश केल्यावरही विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळेल याची शास्वती नाही. कारण खासगी शाळांनीही लूट माजवली आहे. शिक्षणाचा दर्जा जरी काही प्रमाणात चांगला असला तरी विद्यार्थ्यांना शिकवणी वर्ग लावावा लागतो. म्हणजे शाळेतील शिक्षण योग्य नाही असेच म्हणावे लागेल.
वणीमध्ये नगर परिषदेच्या एकूण 8 प्राथमिक शाळा आहे. तेथील शिक्षक व विद्यार्थ्यांची संख्या ही अत्यंत कमी आहे. त्यातच शिक्षणाचा दर्जा हा अगदी नगण्य आहे. सरकारी शाळांची ही अवस्था का झाली? याचा विचार सहसा कुणीही करतांना दिसून येत नाही. त्याचाच फायदा खाजगी संस्था घेत आहे. भव्य अशी इमारत, विस्तीर्ण जागा, सुशिक्षित शिक्षक वृंद अशा मोठमोठ्या जाहिराती लावरून जनतेला आपल्या संस्थेकडे आकर्षित करण्याचे काम इंग्रजी माध्यमाच्या शाळा करीत आहे. वास्तविक परिस्थिती काही वेगळीच आहे.
अत्यंत तुटपुंज्या वेतनामध्ये सुशिक्षित बेरोजगारांची येथे पिळवणूक केल्या जाते. संस्थाचालक मात्र गलेलठ्ठ फी वसूल करून बसतो आहे. त्यावरच समाधान न मानता शाळेचे जोडे, ड्रेस, पुस्तके शाळेतच विकल्या जातात. 500 रुपयांची वस्तू 1400 ते 1500 रुपयात विकल्या जाते. हा व्यवसाय खाजगी शिक्षण संस्था करीत आहे. यावर सरकारचे कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसून येते.
ही लूट केव्हा थांबणार असा आर्त सवाल जनता व काही सामाजिक संस्था गेल्या कित्येक वर्षांपासून विचारते आहे. खाजगी शाळेत प्रवेश घेतल्यानंतरही शिकवणी वर्ग लावावे लागते ही किती मोठीं शोकांतिका म्हणावी लागेल. या सर्व प्रकारात फक्त पालक व विद्यार्थी यांची पिळवणूक होत आहे. ही पिळवणुक केव्हा थांबणार असा सवाल सुजाण नागरिकांना उपस्थित करीत आहे.