वाहनांमध्ये प्रोजेक्टर हेलोजन वापरण्याची स्पर्धा
प्रोजेक्टर हेलोजनमुळे अपघाताची शक्यता बळावली
गिरीश कुबडे, वणी: शहरातील वाहनांची वाढती संख्या बघता त्या प्रत्येकजण आपल्या वाहनाला काही वेगळे करता येईल काय यासाठी काहीतरी खटाटोप करण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यात युवा वर्गात स्पर्धा सुरू आहे. सध्या वणीत प्रोजेक्टर हेडलाईट्सची चांगलीच स्पर्धा सुरू आहे. वाहनांना लावण्यात आलेले हे पांढरे हेडलाईट काहींसाठी फॅशन ठरत आहे. तर इतरांसाठी मात्र हे जीवघेणे ठरत आहे.
प्रोजेक्टर हेलोजनचा प्रकाश हा गाडीत लावलेल्या इतर हेलोजनपेक्षा प्रखर असतो. त्यामुळे समोरुन वाहन कोणत्याच प्रकारे दिसत नाही त्यामुळे अपघात घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. वणी शहरात सध्या या लाईट्सने चांगलाच धुमाकुळ घातला आहे. मात्र अशा वाहनधारकांवर कोणत्याही प्रकारची कार्यवाई होताना दिसत नाही. त्यामुळे प्रोजेक्टर हेडलाईट लावण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
हेडलाईट पांढरा शुभ्र लाईट लावून समोरच्या वाहन धारकाला दिपवण्याची जणू शहरात मोठ्या प्रमाणत स्पर्धाच लागली आहे. वाहनांना त्या कंपनीने दिलेल्या प्रकाशापेक्षा जास्त व्होल्टेजचे बल्ब लावण्याची परवानगी कोणतीही परिवहन कार्यालय देत नाही. मात्र मेकॅनिकला हाताशी धरून तरुण वाहन चालकांनी सर्रास असा हेलोजन बल्ब लावण्यास सुरुवात केली आहे. पोलीस विभागाने जर अशा वाहनांवर लवकरात लवकर कार्यवाही केली नाहीत तर याचे प्रमाण शिगेला पोहोचून शहरात गंभीर अपघाताची संख्या वाढण्यास नक्कीच मदत होईल.