जब्बार चीनी, वणी: कोरोना संकटामुळे यंदा राज्यातील एकाही पोलिस अधिकारी, कर्मचा-यांची बदली अथवा बढती होणार नाही, असा आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढला आहे. त्यामुळे बढती आणि बदलीपात्र पोलिसांचा हिरमोड झाला आहे.
वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे सध्या वैद्यकीय आणि पोलिस विभागावर प्रचंड ताण आहे. कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्याने अनेक डॉक्टर्स, नर्स व पोलीस पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यातील साडेतीन हजारांवर पोलिस कोरोनाबाधित असून 33 पोलिसांचे बळी गेले आहेत. त्यावर उपाययोजना म्हणून शासनाने 55 वर्षावरील पोलिसांना कोरोनाची ड्यूटी देणे बंद केले आहे. त्यांना कार्यालयीन कामात गुंतविले आहे.
दरम्यान, एप्रिल-मे महिन्यात पोलिस दलामध्ये बढती आणि बदल्यांचे आदेश निघत असतात. जिल्हा पोलिस दलातही बदल्यांच्या हालचाली सुरू असतात. अनेकांना बदल्यांची चाहूल लागते. मात्र, यंदा कोरोना संकटामूळे शासनातर्फे करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमध्ये सातत्या राखण्यासाठी एकाही अधिकारी व कर्मचा-यांची बदली करू नये, असे आदेश अपर पोलिस महासंचालक आस्थापना कुलवंत सारंगल यांनी दिले आहेत.
पोलिसांनी लावली होती ‘फिल्डिंग’
कोरोना संकटाचा सामना करीत असतानाच जिल्हा पोलीस दलाने यंदा बदल्यांची तयारी सुरू केली होती. पोलिस उपायुक्त मुख्यालय मीना मकवाना यांनी बदलीपात्र कर्मचा_यांची यादी बनविण्याचे आदेश दिले होते. तसेच, पोलीस ठाण्याकडून बदलीपात्र अधिकारी, कर्मचा-यांची यादीही मागविली होती. विनंती बदलीसाठीही अर्ज देण्याचे सांगण्यात आले होते. त्यादृष्टीने पोलिसांनी अर्जदेखील केले होते. यवतमाळ एलसीबी सहीत काही महत्वपूर्ण पोलिस ठाण्यांसाठी ‘फिल्डींग’ ही लावणे सुरू होते.
सेटिंग फिल्डिंग आणि अपेक्षाभंग
राज्य पोलिस दलातील अनेक वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी चांगली पोस्टिंग मिळविण्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांसोबत ‘सेटिंग’ लावले होते. चांगले पोस्टिंग पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न सुरू होते; पण आता करोना महामारीमुळे बदल्या होणार नसल्यामुळे अनेक वरिष्ठांचा अपेक्षाभंग झाला आहे.