वणीत किरीट सोमय्यांच्या प्रतिमेला ‘जोडे मारा’ आंदोलन
जितेंद्र कोठारी, वणी: भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या संदर्भातील वादग्रस्त व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या व्हिडीओ नंतर राज्यभरात सोमय्यांविरोधात संतापाचे वातावरण असून वणीत महिला काँग्रेसतर्फे ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले. यावेळी महिलांनी किरीट सोमय्या सारख्या अश्लील नेत्यावर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी केली. यावेळी महिलांनी घोषणाबाजी देखील केली.
किरीट सोमय्या यांनी आतापर्यंत विविध विरोधी पक्षांच्या नेत्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यामुळे विरोधकांचा सोमय्या यांच्यावर प्रचंड राग आहे. त्यातच सोमवारी सोमय्या यांच्या संदर्भातील वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे सोमय्या यांच्याविरोधात महिला काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळी 11 वाजता महिला टिळक चौकात गोळा झाल्या. तिथे त्यांनी सोमय्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला.
भाजप कारवाई करणार का?
सोमय्यामुळे संपूर्ण राज्याची मान शरमेने खाली गेली आहे. सोमय्या हे भाजपचे नेते आहे. सोमय्यांच्या तक्रारीवरून भाजप सरकारने ईडी, सीबीआयचा वापर करून अनेक निरपराध नेत्यांना जेलमध्ये टाकले. आता दुस-यांवर आरोप करणारे स्वत:च आरोपीच्या पिंज-यात अडकलेआहे. त्यांच्यावर भाजप कारवाई करणार का? असा सवाल उपस्थित महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वंदना आवारी यांनी उपस्थित केला.
यावेळी यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष वंदना आवारी, वणी तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष संध्या बोबडे, वणी तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा सविता ठेपाले, मारेगाव महिला काँग्रेस अध्यक्षा माया गाडगे, माजी नगराध्यक्ष शालिनी रासेकर, माजी नगराध्यक्ष आशा टोंगे, माजी नगराध्यक्ष साधना गोहोकर, विजया आगबत्तलवार, वंदना धगड़ी, शारदा खाडे, संगीता खाडे, कविता चटकी, प्रमिला पावडे, ललिता बरशेट्टीवार, छाया निंदेकर, राजश्री शास्त्रकार, माया जयपूरकर, मंगला टोंगे, वर्षा बोरघाटे, उज्वला दोडके, अंतकला मासीरकर, बेबी कोललेरकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
Comments are closed.