आदिवासी आरक्षण बचाव कृती समितीचा आक्रोश मोर्चा मंगळवारी

समाजातील सर्वांनी मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन

भास्कर राऊत, मारेगाव: येथील आदिवासी बचाव कृती समितीचा 3 ऑक्टोबरला मारेगावात मोर्चा निघणार आहे. आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये इतर समाजाचा समावेश करून आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावण्यात येऊ नये, हा मोर्चाचा हेतू आहे.

सध्या देशात सगळीकडे आरक्षणांचे वारे वाहत आहेत. धनगर समाजही एस. टी. प्रवर्गामध्ये आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करीत आहे. धनगर समाजाला जर एस. टी. प्रवर्गामध्ये आरक्षण दिलं तर आदिवासींचं आरक्षण कमी होऊन हा आदिवासींवर अन्याय होणार असल्याचं समितीचं मत आहे. या मोर्चाला शा. को. संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष लेतुजी जुनगरे, संविधानिक हक्क परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ. गीत घोष, गोंडवाना गणतंत्र परिषदेचे प्रदेशाध्यक्ष बळवंत मडावी, बिरसा ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अरविंद कुळमेथे हे मार्गदर्शन करतील.

धनगर समाज हा गैरआदिवासी असल्यामुळं त्यांचं अनुसूचित जमातीमध्ये नाव समाविष्ट करण्यात येऊ नये. बाह्य यंत्रणांद्वारे मनुष्यबळ पुरविण्याचा 6 सप्टेंबर 2023 चा शासननिर्णय रद्द करणे, आदिवासींची विविध शासकीय सेवा योजनांतील रिक्त पदे भरणे, अनुसूचित क्षेत्रांसाठी विस्तारित कायदा 1996 ( पेसा ऍक्ट ) ची अंमलबजावणी करून रिक्त पदे भरणे, 7 जुलै 2023 ला सर्वोच्च न्यायालयानं आदिवासींच्या बाजूनं लावलेल्या निकालाची अंमलबजावणी करणं,

आदिवासी समाजाच्या भोगवटदार वर्ग 2 मध्ये असलेल्या जमिनी भोगवटदार 1 मध्ये आणणे आणि सन 2005च्या आतील ज्या आदिवासी समाजाच्या जमीनीची वहिवाट केली आहे, त्या आदिवासी समाजाला पट्टे बहाल करणे, या प्रमुख मागण्यांसाठी आदिवासी समाजाचा मोर्चा निघेल. या मोर्चात समस्त आदिवासी समाजानं सहभागी होण्याचं आवाहन आदिवासी बचाव कृती समितीचे मारेगाव तालुका अध्यक्ष संजय आत्राम, उपाध्यक्ष शैलेश आत्राम आणि सचिव शंकर मडावी तथा समस्त आदिवासी समाज संघटनेने केलं आहे.

 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.