गिट्टी खदानसाठी मोहदा येथे आज जनसुनावणी

प्रदूषण, नियमबाह्य उत्खनन, ओव्हरलोड वाहतुकीबाबत समस्यांचा पाढा

जितेंद्र कोठारी, वणी: प्रदूषण नियंत्रण मंडळ कडून आज मोहदा (वेळाबाई) येथे जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. जनसुनावणीत निवासी उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, प्रदूषण नियंत्रण मंडळ व खनिकर्म विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहे. मोहदा येथील सर्व क्रॅशर धारकांनी मिळून 100 हॅक्टर भूगर्भातून दगड उत्खननसाठी समूह (Cluster) तयार केले आहे. या क्लस्टरला मंजुरी मिळणेकरीता प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे या जनसुनावणीचे आयोजन करण्यात आले आहे.

वणी तालुक्यातील मोहदा (वेळाबाई) येथे तब्बल 25 गिट्टी क्रॅशर कारखाने आहेत. मोहदा व परिसरातील खाजगी व शासकीय मालकीच्या शेकडो हॅक्टर जमिनीतून दगड उत्खनन केल्या जाते. मागील अनेक वर्षांपासून प्रदूषण व खनिज नियम धाब्यावर बसवून मोहदा येथे उत्खनन व क्रॅशर सुरु आहे. एकाही गिट्टी क्रॅशरवर प्रदूषण नियंत्रण यंत्रणा नसताना प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून क्रॅशर धारकांना प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

क्रॅशर धारकांकडून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या ब्लास्टिंग व उत्खनन केले जात असताना खनिकर्म विभाग मूग गिळून गप्प बसले आहे. मोहदा येथून सुरू ओव्हरलोड वाहतुकीमुळे पुरड, टुंड्रा, मोहदा, वेळाबाई, कोरपना, शिंदोला रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे. गिट्टी क्रॅशरमधून उडणाऱ्या डस्ट व ब्लास्टिंगमुळे मोहदा येथील नागरिक बेजार झाले आहे. मोहदा येथील नागरिकांनी अवैध उत्खनन, नियमबाह्य ब्लास्टिंग व प्रदूषणाबाबत अनेकदा लेखी तक्रारी केल्या. मात्र मुजोर क्रॅशर धारकांवर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही.

औपचारिकता म्हणून जनसुनावणीचे आयोजन !
क्लस्टर बाबत क्रॅशर धारक व संबंधित विभागामध्ये सर्वकाही पूर्वीच ठरलेले आहे. क्लस्टरला मंजुरी देण्यासाठी आवश्यक पूर्तताही करण्यात आली आहे. जनसुनावणीचे आयोजन प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून केले जाते. मात्र या जनसुनावणीत कोण अधिकारी येणार? आक्षेप कोण घेणार? कोणते प्रश्न विचारणार? या सर्व बाबीची तयारी क्रॅशर धारकांनी एक महिन्या आधीपासूनच केली आहे.

हे देखील वाचा:

धोका : जिल्ह्यातील 16 तालुकापैकी वणीत सर्वाधिक पाऊस

शाळेत खेळताना पडलेल्या चिमुकल्याचा अखेर मृत्यू

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.