बहुगुणी डेस्क, वणी: पुनवट गावाजवळील निर्गुडा नदीपात्रात बुडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. देवराव उकीनकर असे मृत शेतक-याचे नाव आहे. गुरुवारी दिनांक 4 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, देवराव उकीनकर (55) हे पुनवट येथील रहिवासी होते. पुनवटजवळ असलेल्या नदीच्या दुस-या तिरावर पुनवट-नवेगाव शिवारात त्यांचे शेत आहे. शेतीचे दिवस असल्याने ते रोज शेतात जागलीसाठी जायचे. गुरुवारी दिनांक 4 सप्टेंबर रोजी ते नेहमी प्रमाणे शेतात जागलीसाठी गेले होते. संध्याकाळ होताच ते परिसरातील आणखी दोन शेतक-यांसह जेवण करण्यासाठी शेतातून घरी परतत होते.
देवराव हे पट्टीचे पोहणारे होते. त्यामुळे ते सोबत असलेले सामान घेऊन नदीच्या दुस-या तिरावर पोहोचणार होते. सामान ठेवल्या नंतर ते इतर दोघांना नदी पार करण्यासाठी मदत करणार होते. पावसाळ्यातील दिवसात हा त्यांचा नेहमीचा दिनक्रम होता. मात्र गेल्या चार दिवसांपासून परिसरात मुसळधार पाऊस होतोय. पावसामुळे नदीला पूर आला आहे. देवराव यांनी नदीत उडी मारताच नदीपात्राने त्यांना कवेत घेतले.
देवराव बुडाल्याचे लक्षात येताच त्यांच्या सहकाऱ्यांनी याची माहिती गावक-यांना दिली. स्थानिकांना ही बाब शिरपूर पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला. घटनेचा पंचनामा करून त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे



Comments are closed.