वणीतील ‘VIP’ रोड झाला ‘खड्डे’बाज, पाऊस येताच साचते डबके
मनसे शहराध्यक्ष अंकुश बोढे यांचा अल्टिमेटम
बहुगुणी डेस्क, वणी: शहरातील एकता नगर ते तहसील कार्यालय या रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. खड्ड्यांनी भरलेल्या या रस्त्यावर पावसाचे पाणी साचून डबकी तयार झाली असून, यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते अंकुश बोडे यांनी वणी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. तातडीने कार्यवाही न झाल्यास ‘मनसे स्टाईल’ आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.
हा रस्ता तहसील कार्यालय, बस स्थानक आणि यवतमाळ मार्गाला जोडणारा महत्त्वाचा शॉर्टकट आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने नागरिक आणि वाहनांची वर्दळ असते. मात्र, रस्त्यावरील मोठमोठे खड्डे आणि साचलेले पाणी यामुळे प्रवास धोकादायक बनला आहे. विशेष म्हणजे, या मार्गावर न्यायाधीश आणि उपविभागीय अधिकाऱ्यांची निवासस्थाने असूनही रस्त्याची दुरुस्ती का होत नाही? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
अंकुश बोडे यांनी निवेदनात म्हटले आहे, “रस्त्याची दुरवस्था तात्काळ दूर करावी, अन्यथा मनसे आपल्या पद्धतीने आंदोलन करेल.” या निवेदनाची प्रत उपविभागीय अधिकारी, वणी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग, वणी यांनाही पाठवण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत नगरपरिषद यावर काय कार्यवाही करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


Comments are closed.