पुसद अर्बनचा अध्यक्ष जेलमध्ये ! खातेदार संभ्रमात ?

डमी लोकांच्या नावावर कोट्यवधींचे कर्ज; संशयाचे ढग

बहुगुणी डेस्क: नागपूर येथील कंत्राटदार मुन्ना वर्मा यांच्या आत्महत्ये प्रकरणी पुसद अर्बन को-ऑप. बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांना अटक करण्यात आली होती. मात्र या प्रकरणात त्यांना जामीन मिळाला. दरम्यान पोलिसांच्या चौकशीत पुसद अर्बन व भारती मैंद पतसंस्थेने डमी लोकांच्या नावे कोट्यवधींचे कर्ज देऊन फसवणूक केल्याचे प्रकरण उघडकीस आले. त्यामुळे त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्य गुन्हे शाखेने कठोर कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केला असून, व्हिसलब्लोअर्सना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर वृत्तपत्रात येणा-या विविध बातम्या आणि त्यामुळे पसरलेल्या अफवांमुळे खातेदारांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. याआधी यवतमाळ जिल्ह्यातील एक मोठी बँक अशाच प्रकारामुळे आर्थिक डबघाईस आल्याने अनेक खातेदारांचे पैसे अडकले होते. 

कंत्राटदार मुन्ना वर्मा आत्महत्या प्रकरण
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नागपूर येथील कंत्राटदार पेनमाचा वेंकटेश्वर वर्मा उर्फ मुन्ना वर्मा (61) हे नागपुरातील एका सरकारी कंत्राटदार होते. ते साउथचे सुपरस्टार प्रभास यांचे नातेवाईक देखील होते. सरकारी कंत्राटाची मोठी थकबाकी त्यांना मिळाली नव्हती. तसेच त्यांनी पुसद अर्बन को-ऑपरेटीव्ह बँकेतून मोठ्या प्रमाणात कर्ज उचलले होते. कर्ज वसुलीच्या तगाद्यापोटी त्यांनी आत्महत्या केली होती. या प्रकरणी पुसद अर्बनचे अध्यक्ष शरद मैंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली. त्यांना जामीन मिळाला. मात्र डमी लोकांच्या नावे कर्ज मंजूर करण्याचे आणखी एक प्रकरण समोर आहे.

फसवणुकीचे प्रकरण बाहेर
मुन्ना वर्मा यांच्या आत्महत्येची माहिती कंत्राटदार चंद्रसेन यादव (43) रा. सावंगी मेघे वर्धा यांना मिळाली. यादव यांनी भारती मैंद पतसंस्थेत डिसेंबर 2023 साली कर्ज घेण्यासाठी अर्ज केला होता. शरद मैंद यांनी यादव यांना साक्षीदार म्हणून आधार कार्ड व पॅन कार्ड धारक असलेल्या 12 लोकांना आणण्यास सांगितले. त्यानुसार यादव हे 9 लोकांचे आधार व पॅन कार्ड घेऊन यादव यांच्याकडे गेले होते. त्यानंतर साक्षीदारांची को-या कागदांवर सही घेतली व त्यांना परत पाठवले. त्यांना कर्ज देण्यात आले नाही. त्यानंतर मार्च 2025 मध्ये यादव यांना पैशाची गरज होती. तेव्हा ते पुन्हा शरद मैंद यांच्याकडे गेले होते. त्यावेळी त्यांना 5 लोकांना साक्षीदार म्हणून आणण्यास सांगितले. को-या कागदावर सही घेत त्यांना 1.95 कोटींचे कर्ज मजूर करण्यात आले. मात्र त्यांना 1 कोटी 8 लाख रुपये देण्यात आले.

दरम्यान यादव यांना साक्षीदार म्हणून आणलेल्या 14 मजुरांच्या नावे 6.68 कोटीचे कर्ज जारी करण्यात आल्याचे कळले. बनावट प्रकल्प अहवाल, खोटी तारण मालमत्ता आणि खोटे दस्तऐवज वापरून गरीब कुटुंबातील लोकांच्या नावावर कर्ज मंजूर करण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात त्यांना कोणतीही रक्कम मिळाली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच यादव यांच्या तक्रारीवरून शरद मैंद यांच्यावर नागपूर येथील अजनी पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल करण्यात आला.

फिक्स डिपॉजिट काढण्यास गर्दी !
यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँक ही ठेवीदारांचा विश्वास गमावल्याने आर्थिक डबघाईस आली होती. यात अनेक ठेवीदारांचे पैसे अडकले. हा पूर्वातिहास पाहता ठेवीदारांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. त्यातच पुसद अर्बनच्या अध्यक्षाला आधी आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्याखाली व त्यानंतर फसवणुकीच्या आरोपावरून अटक करण्यात आल्याने विविध अफवांना व चर्चेला ऊत आला आहे. महागाव येथील पुसद अर्बन पतसंस्थेच्या शाखेत ठेवीदारांनी फिक्स डिपॉजिट काढण्यासाठी गर्दी केली. याचे वृत्त प्रकाशित होताच ठेवीदार संभ्रमावस्थेत असल्याचे दिसून येत आहे.

व्हिसल ब्लोअर्सना पुढे येण्याचे आवाहन
मीडिया रिपोर्ट नुसार, बँक रेकॉर्डचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यात येणार असून अनेक प्रकरणातील व्यवहार संशयास्पद असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या फसवणुकीच्या प्रकरणात आणखी अटक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यातच गुन्हे शाखेने कठोर कारवाई करण्याचा निर्धार व्यक्त केला असून, व्हिसलब्लोअर्सना (जागल्या) पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान नागपूर खंडपीठातील उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाने याआधी पोलिसांना तपास सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते, मात्र न्यायालयाच्या परवानगीशिवाय आरोपपत्र दाखल करू नये असेही स्पष्ट केले आहे. मैंद व अन्य आरोपींनी दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी 4 ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी असून, पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Comments are closed.