बहुगुणी डेस्क, वणी: एका भरधाव दुचाकीची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकला मागून जबर धडक बसली. यात दुचाकीस्वार व मागे बसलेला त्याचा सहकारी ठार झाला आहे. वणी कायर रोडवर उमरीगावाजवळ संध्याकाळी 7.30 वाजताच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. हे दोन्ही तरुण वणीतील रहिवासी असून त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर रस्त्याच्या कडेला बंद अवस्थेतील ट्रकला धडक बसल्याने सातत्याने अपघात होत आहे. यामुळे संताप व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, सचिन प्रकाश येल्लरवार (25) रा. गायकवाड ले आऊट नांदेपेरा रोड येथील रहिवासी असून तो रेस्टॉरन्ट व्यवसायात होता. तर संदीप विजय चामुलवार (38) रा. रंगारीपुरा वणी हा त्यांच्यासोबत काम करीत होता. गुरुवारी ते काही कामानिमित्त कायर परिसरात दुचाकीने गेले होते. रात्री ते वणीला परतत होते. उमरी ते नवरगाव या दरम्यान एक ट्रक गेल्या दोन दिवसांपासून बंद अवस्थेत उभा आहे. दुचाकीने परतत असताना त्यांच्या दुचाकीची या ट्रकला मागून जबर धडक बसली. यात दोघांच्याही डोक्याला जबर मार लागला. अती रक्तस्रावाने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
वार्डात शोककळा, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द
सर्व लोक दसरा उत्सव साजरा करण्यात व्यग्र होते. सचिन व संदीपच्या मृत्यूची बातमी कळताच परिसरात शोककळा पसरली. रंगारीपुरा येथील स्थानिक दुर्गा मंडळाजवळ ठेवण्यात आलेला जगराता व महाप्रसादाचा कार्यक्रम मध्येच थांबवण्यात आला. तसेच मंडळातर्फे करण्यात आलेले इतर सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले. होतकरु तरुणांच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली व त्यांनी घटनेचा पंचनामा केला. तर अपघातास कारणीभूत असलेला ट्रक जप्त करून पोलीस ठाण्यात लावला गेला. विशेष म्हणजे चार दिवसाआधीच सोमनाळा फाट्याजवळ एक ट्रकची दुस-या बंद ट्रकला मागून धडक बसली होती. यात एकाचा मृत्यू तर चार मजूर गंभीर जखमी झाले. बंद ट्रक हे मृत्यूलोकाचे द्वार बनत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.





Comments are closed.