वणीत आजही मद्यपींच्या दारु खरेदीसाठी लागल्या रांगा
वाईनशॉपसमोरील गर्दी दुपारी 12 नंतर ओसरली
जब्बार चीनी, वणी: जिल्ह्यात मद्यविक्रीला परवानगी मिळताच वणीकरांनी आजही सकाळी दुकानासमोर एकच गर्दी केली. पुरेसा बंदोबस्त व दिलेले नियम व अटींचे पालन करत आज मद्यविक्री सुरू होती. भर उन्हात लोकांनी वाईनशॉप समोर गर्दी केली होती. एका वाईनशॉप समोरील रांग ही सुरुवातीला राजपुताना हॉटेल पर्यंत तर दुस-या वाईन शॉप समोरील गर्दी ही भारत माता चौकापर्यंत गेलेली दिसून आली. दुपारी 12 नंतर वाईनशॉप समोरील गर्दीही ओसरू लागली. मात्र देशी भट्टीसमोर तुरळक गर्दी दिसून आली. लोकांनी किंमत वाढल्यावर त्रास होऊ नये किंवा पुन्हा बंद झाल्यास गैरसोय होऊ नये म्हणून आजच घरी स्टॉक करून ठेवला. आज दोन वाईन शॉप सुरू असल्याने ‘एक से भले दो’ या प्रत्यय वणीकरांना आला.
वणीत वाईनशॉप समोर झालेल्या गर्दीमुळे जिल्हाधिका-यांनी गुरूवारी मद्यविक्रीचा आदेश रद्द केला होता. त्यामुळे काही नियम व अटी घालून सोमवारपासून पुन्हा मद्यविक्रीस परवानगी दिली. ग्राहकांचे थर्मल स्क्रिनिंग व सॅनिटायझेशनही बंधनकारक असल्याने त्याच्याही तयारी केली होती. ग्राहकांमध्ये सुरक्षीत वावर राहण्यासाठी दुकानांसमोर खडूने चौकोन व गोल रिंगणही रात्रीतून करण्यात आले, तसेच दुकानांत गर्दी होऊ नये, यासाठी बॅरिकेट्स लावण्यात आले होते. यासोबत दुकानांसमोर होणा-या संभाव्य गर्दीमुळे रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा येऊ नये, यासाठीही उपाययोजना करण्यात आल्या होत्या.
अखेर दिवस उजाडला…
रविवारी सायंकाळीच मद्यविक्रीला परवानगी दिल्याचा मॅसेज सोशल मीडियातून व्हायरल झाला होता. त्यामुळे मद्यपींच्या चेह-यावर रात्रीच हास्य उमटले होते. कधी दारू विक्री सुरू होणार आणि कधी रांगेत लागणार जर रांगेत लागायचं नसले कशी सोय करावी याचिंतेत शौकिनांची रात्र गेली. अखरे दिवस उजाडला. मद्यशौकिनांनी सकाळी 6 वाजेपासूनच वाईन शॉपसमोर गर्दी केली. मात्र दुपारी 12 नंतर ही गर्दी ओसरू लागल्याचे चित्र दिसून आले.
मद्यविक्रेत्यांचे सावध पाऊल…
पार्थ वाईन समोर झालेल्या गर्दीचा परिणाम संपूर्ण जिल्ह्याला भोगावा लागल्याने यावेळी सर्वच वाईन शॉप आणि भट्टी चालकांनी ग्राहकांबाबत सावधगिरी बाळगली. कुठेही गर्दी होणार नाही याची काळजी घेतली. ग्राहकांवर सॅनिटायझरची फवारणी केली जात होती. तर ग्राहकांचे मशिनद्वारा थर्मल स्कॅनिंग केले जात होते. त्यामुळे आधीपासून धडा घेतल्याचे चित्र वणीत दिसून आले.
‘नवाबजादे’ सावलीत, गरजू रांगेत..
रांगेत कुणी बघू नये तसेच उन्हाचा तडाखा सहन करावा लागू नये यासाठी काही बड्या व्यक्तींनी बाजुच्या दुकानातील सावलीचा आडोसा घेतला व इतर गरजुंना रांगेत उभे केले. त्यासाठी रांगेत थांबण्यासाठी पन्नास ते शंभर रुपये दिले जात होते. हे गरजू रांगेत थांबायचे पैसे घेऊन संबंधितांना दारुची बाटली आणून देत होते. त्यामुळे ‘नवाबजादे सावलीत, गरजू रांगेत’ असेच चित्र वाईन शॉपच्या बाहेर दिसत होते.
मास्क आले चेहरा लपवण्याच्या कामात…
करोनामुळे तोंडाला मास्क बांधून बाहेर पडणे बंधनकारक असल्याने मद्यपींची चांगलीच सोय झाली. मास्क वा रुमाल बांधलेल्या अवस्थेत आपली ‘ओळख’ कोणालाही पटणार नाही, याचेही समाधान त्यांच्यात होते. रांगांतून नात्यागोत्यातील वा मित्र परिवारातील अनेकजण दिसले तरी त्यांना तेथे ‘ओळख’ दिली जात नव्हती. रांग मोडली जाऊ नये, यासाठी काही वाइन शॉपच्या बाहेर खासगी बाउन्सर, सुरक्षारक्षक यांना तैनात करण्यात आले होते. काही दुकानांच्या बाहेर पोलिस बंदोबस्त सुद्धा दिसत होता.
तालुक्यात 15 दारूचे दुकानं सुरू
मद्यविक्रीच्या अटी-शर्तींचे पालन करणाऱ्या व तसे लेखी लिहून देणाऱ्या तालुक्यातील 20 दुकानांना दारु विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. यात देशीविदेशी दारुविक्री करणारे 2 वाइन शॉप, एक बियर शॉपी, तर देशी दारु विक्री करणा-या 17 दुकानांचा समावेश आहे. परंतु सॅनिटायझर, थर्मल स्कॅनिंगसारख्या सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याने 5 देशी दारूची दुकाने 11 वाजेपर्यंत सुरू झाली नव्हती. उद्यापासून इतर सर्व दुकानं सुरू होईल अशी माहिती विक्रेत्यांनी ‘वणी बहुगुणी’ला दिली.