विवेक तोटेवार, वणी: वणीतील खडबडा येथे 14 जुलै रोजी रात्री 1 वाजताच्या सुमारास जुन्या वादातून मित्रांच्या दोन गटात राडा झाला. यात दोन भावांना 4 जणांनी बेदम मारहाण केली. मारहाणीत एका भावाच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. तर दुसरा भाऊ हा किरकोळ जखमी आहे. फिर्याफीच्या तक्रारीवरून वणी पोलिसात चौघांविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार समीर (बदललेले नाव वय 14) रा. रंगनाथनगर येथील रहिवासी असून तो 11 व्या वर्गात शिकतो. तो रविवारी दिनांक 14 जुलै रोजी रात्री 1 वाजताच्या (सोमवार) दरम्यान त्याच्या लहान भावासह खडबडा येथे सवारी पाहण्यासाठी गेला होता. यावेळी त्याच्या वार्डातील काही समवयस्क परिचितही तिथे पोहोचले होते. त्यातील सनी (बदललेले नाव वय 14) याने हातवारे करून समीर व त्याच्या भावाला धमक्या दिल्या व त्याला बाजूला नेऊन मारहाण केली.
याचवेळी सनीचा मोठा भाऊ (19) व त्याचा मित्र (17) हे देखील तेथे आले व त्यानेही या दोघांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यातील एकाने लाकडी दांड्याने समीरच्या लहान भावाच्या डोक्यावर प्रहार केला. तसेच हातातील मोबाईल फोडून टाकला. याचवेळी त्यांचा आणखी एक साथीदार (17) आला व त्याने ही मारहाण केली.
मारहाणीनंतर समीरने आपल्या नातेवाईकांला फोन वरून सर्व घटनाक्रम सांगितला व त्याला बोलावून घेतले. समीरच्या नातेवाईकांनी दोन्ही भावाला उपचारासाठी वणीतील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मारहाणीत लहान भावाच्या डोक्याला टाके पडले तर समीर किरकोळ जखमी झाला.
काय होते भांडणाचे कारण?
सर्व आरोपी व मारहाण झालेले दोघे भाऊ हे एकमेकांचे परिचित आहेत. शिवाय ते एकाच वार्डात देखील राहतात. समीर व आरोपी सनी हे एकाच शाळेत शिकत होते. गेल्या वर्षी समीरच्या लहान भावाचा सनीशी शुल्लक कारणावरून वाद झाला होता. या वादाचा वचपा काढण्यासाठी सनी हा दोन्ही भावाच्या मागावर होता. त्यांना खरबडा येथे दोघे एकत्र दिसल्याने सनीने मित्रांना सोबत घेऊन या दोघांवर हल्ला केला.
उपचारानंतर समीरने आपल्या वडिलांना सोबत घेत वणी पोलीस स्टेशन गाठले. त्यांनी मारहाण करणा-या चारही आरोपींविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या 351 (3), 351 (2), 324(5), 324 (4), 3 (5), 118 (2), 115 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.
Comments are closed.