झरी तालुक्यात हातभट्टीवर धाडसत्र, 300 लीटर दारू नष्ट
डोंगरगाव पारधी पोड, मारोती पोड, पाचपोहर येथील भट्टी उद्ध्वस्थ
सुशील ओझा,झरी: झरी तालुक्यात हातभट्टीवर गाळण्यात येणा-या अड्यावर पोलिसांनी धाडसत्र सुरू केले. डोंगरगाव पारधी पोड, मारोती पोड व पाचपोहर येथील हातभट्टीवर धाड टाकून पोलिसांनी हातभट्टी उद्धवस्थ केली. मुकुटबन व पाटण पोलिसांतर्फे ही कारवाई करण्यात आली. यात सर्व वेगवेगळ्या घटनांमध्ये 300 लिटर गावठी दारू जप्त करून दारू, सडवा व भट्टी नष्ट करण्यात आली.
कोसारा गावाजवळील पारधी पोड येथे रसायनाचा वापर करून गावठी दारू काढण्याची खबर मिळताच ठाणेदार धर्मा सोनुने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज राठोड, रंजना सोयाम, पुरुषोत्तम घोडाम, स्वप्नील बेलखेडे, सुलभ उईके, नीरज पातूरकर, प्रदीप कवरासे यांनी आपल्या मोटर सायकलने पोहचले. दोन पंचासमक्ष घर गाठून झडती घेण्यास सुरुवात केली असता घरच्या मागे ताटव्याच्या भिंतीमागे प्लास्टिकच्या कॅन मध्ये 25 किलो मोहाचा सडवा किंमत 1400 रुपयांचा मिळून आला.
पोलीस गावात आल्याची चाहूल लागताच आरोपी गणेश मालवे हा फरार झाला. पोलिसांनी त्याचा शोध त्याच्या शेतात व नाल्याजवळ घेतला परंतु मिळून आला नाही. त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अंतर्गत कलम 65 (ई)अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाटण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पाचपोहर व मारोतीपोड येथे अश्याच प्रकारे दारू काढून विक्री होत असल्याची माहिती ठाणेदार यांना मिळताच २१ एप्रिल च्या पहाटे 3 वाजता ठाणेदार अमोल बारापात्रे स्वतः व पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे ज्ञानेश्वर सोयाम होमगार्ड आकाश व राजू याना घेऊन पहाटे तीन वाजता घटनास्थळी पोहचले. त्यांना तिथे दारू आढलून आली. त्यांनी 4 ड्रम गावठी दारू अंदाजे ३०० लिटर नष्ट केली व साहित्य जप्त केले.
२० एप्रिल 11.15 वाजता जमादार रमेश पिदूरकर यांना दौलत सोनू टेकाम हा इसम एका शेताच्या नाल्याजवळ गावठी हातभट्टीची दारू काढत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून जमादार रमेश पिदूरकर हे आपल्या कर्मचाऱ्या सह घटनास्थळी पोहचले असता 30 लिटर मोहफुल सडवा 3 हजार 5 लिटर मोहाची दारू 500 रुपये व दारू काढण्याचे साहित्य असे एकूण 3 हजार 500 रुपयाचा मिळाल्यावरून आरोपी दौलत टेकाम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली.
तालुक्यात इंग्लिश व देशी दारू ग्रामीण भागातील जनतेला मिळत नसल्याने अखेर तालुक्यातील बहुतांश पोडवर मोहाची गावठी हटभट्टीची दारू मोठ्या प्रमाणात काढण्यात येत आहे. इंग्लिश किंवा देशी दारू नाही मिळाली तरी चालेल परंतु हातभट्टीची दारू मिळालीच पाहिजे अश्या आशेवर तालुक्यातील मद्यपी जनता फिरतांना दिसत आहे. कमी पैशात मदयपींचा शौक पूर्ण होत असल्याने तसेच इतर दारू मिळत नसल्याने अनेक ठिकाणी हातभट्टीची गावठी दारू काढून विक्री सुरू आहे. मुकूटबन व पाटण पोलिसांच्या धाड सत्रामुळे हातभट्टी दारू विक्रेत्यात मोठी दहशत पसरली आहे.