विवेक तोटेवार, वणी: बुधवारी वणी पोलिसांनी घुग्गुस रोड व बेलदारपुरा येथे दारू तस्करांविरोधात कारवाई केली. दोन वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत सुमारे 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय अधिकारी यांच्या चमूने केली आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली तर एक आरोपी गाडी सोडून पळून जाण्यात यशस्वी झाला.
बुधवार 10 फेब्रुवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास एक वाहन चंद्रपूर येथे दारू घेऊन जाणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. माहितीवरून पोलिसांना वणी घुग्गुस रोडवर नाकाबंदी केली असता तिथे एक स्कॉर्पिओ वाहन (MH14 AE6959) आले. पोलीस या ठिकाणी जाताच आरोपी वाहनाचा दरवाजा उघडून पळून गेला. पोलिसांनी पाठलाग केला परंतु आरोपी मिळून आला नाही. या प्रकरणी पोलिसांनी 49 हजार 400 रुपयांची देशी दारू व स्कॉर्पिओ वाहन जप्त केले. वाहन सोडून पळून जाणारा संदीप वाघमारे याचा पोलीस शोध घेत आहे.
दुसरी कारवाई रात्री रात्री 1.20 वाजताच्या सुमारास बेलदारपूरा येथील गणपति मंदिरापुढे करण्यात आली. या कारवाईत एक इंडिका विस्टा कार (MH34 AA 9337) दारू व वाहन एकूण किंमत 1 लाख 73 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यातील आरोपी रामदास साधुजी निखाडे (39) रा. बेलदारपूरा यास अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींवर कलम महाराष्ट्र दारूबंदी कायदा 65 (अ) (इ) नुसार गुन्हा नोंद केला आहे.
सदर कारवाई डॉ दिलीप पाटील भुजबळ पोलीस अधीक्षक, खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक, संजय पुजलवार उपविभागीय पोलीस अधिकारी, वैभव जाधव ठाणेदार वणी यांच्या मार्गदर्शनाखात पोऊनी शिवाजी टिपूर्णे, प्रदीप ठाकरे, विजय वानखेडे, इकबाल शेख, रवी इसनकर, परेश मानकर, आशिष टेकाडे, संतोष कालवेलवार, अशोक दरेकर, दडमल यांनी केली.
हे देखील वाचा: