वणी-वरोरा बायपास रेल्वे क्रॉसिंगजवळ धुळीचे साम्राज्य
प्रदूषणात वाढ नागरिकांचे आरोग्य धोक्यात
गिरीश कुबडे, वणी: वणी परिसरात मोठ्या प्रमाणात कोळशाच्या खाणी असल्याने या खाणीतून कोळशाची वाहतूक हि मोठ्या प्रमाणात होत असते. मात्र कोळशाची वाहतूक होत असतांना त्या वाहनावर ताळपत्री झाकली जात नसल्याने ट्रकमधून मोठ्या प्रमाणावर कोळसा खाली पडत असतो. सोबतच कोळशाची वाहतूक ओवरलोड होत असल्याने रस्त्याची स्थिती वाईट होत चालली आहे आणि प्रदूषणात वाढ होत आहे. त्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊन अनेक आजाराच्या संख्येत वाढ झाली आहे.
या रस्तावर शाळा आणि कॉलेज असल्याने रहदारी खूप असते. या परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रदूषण आहे कि वाहनधारकांना समोरचे वाहन या प्रदूषणामुळे दिसत नसल्याने अपघाताची शक्यता बळावली आहे. रेल्वे क्रॉसिंग परिसरात आय.वि.आर.सी.एल कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर टोल वसुली जोमात सुरु आहे.
एवढ्या प्रमाणात ट्रककडून वसुली करून सुद्धा रस्त्यावर साधे पाणी मारण्याचे कार्य सुद्धा हि कंपनी दाखवत नाही आहे. याचमुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. प्रशासनास आणि लोकप्रतिनिधीना या परिस्तिथीकडे लक्ष देण्यास सुद्धा वेळ नाही अशी परिस्तिथी निर्माण झाली आहे. तरी प्रदूषण मंडळाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिक करीत आहे.