रफीक कनोजे, झरी: पाटण पोलीस ठाणे अंतर्गत सुर्दापुरजवळ रेल्वे ट्रॅकचे काम करीत असताना एका रेल्वे कर्मचार्याचा रेल्वेखाली दबुन मृत्यू झाला. ह्याचा मृत्यु लिंगटी रेल्वेस्थानकापासून १४ किलोमीटर अंतरावर सुर्दापुर वळणावर झाला.
राकेश पोशट्टी तोकलवार (३२) हा मुळचा मुकटबनचा असलेला रहिवासी हल्ली आदिलाबाद येथे राहतो. त्याचे वडील पोशट्टी तोकलवार यांनी स्वेछनिवृत्ती घेतल्यामुळे त्यांच्या जागेवर रेल्वेमध्ये गॅंगमॅन ह्या पदावर तो काम करीत होता. शुक्रवारी तो सतपल्ली ते कमळवेल्ली ह्या मार्गाच्यामधे ९००-१४/९०० किलोमीटरच्या सुर्दापुर वळणावरील दगडाजवळ दोन्ही रेल्वे रुळाच्या मध्ये बसुन ग्रिसिंगचे काम करीत होता. त्याच वेळी नंदीग्राम एक्सप्रेस लिंगटी रेल्वे स्थानकावरुन आपल्या निर्धारित वेळेवर नागपूर कडून मुंबई कडे जात होती.
रेल्वे लिंगटी रेल्वे स्थानकावरुन ११: ३० च्या दरम्यान सुटली आणि लिंगटी स्थानकापासून १४ किमी अंतरावर दुपारी १२-५० वाजता राकेश तोकलवार काम करीत असलेल्या ठिकाणी पहोचली. कामात मग्न असलेल्या राकेशला कळायच्या आतच रेल्वे खाली तो दबला गेला व त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. पोलीस उप निरीक्षक अनिल चौधरी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
सध्या पाटण पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली असुन संध्याकाळी त्या प्रेताला उत्तरीय तपासणी साठी पोस्टमार्टम गृहात पाठविले आहे. पुढील तपास पीएसआय अनिल चौधरी करीत आहे. राकेश काम करीत असताना रेल्वे रुळाच्या चाब्यांना ग्रीसिंग करीत असल्याचे माहिती नसल्याने किंवा कामात दंग असल्याने रेल्वे येण्याची चाहुल राकेशला लागली नाही असा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे.