जब्बार चीनी,वणी: नंदिग्राम एक्सप्रेस आणि काही गाड्या वणीकरांसाठी प्रवासाचा मोठा आधार होता.नंदिग्रामने ‘नाही’ची मान हलवली. ऑक्टोबरमध्ये राज्यात व देशात अनलॉक 5 सुरू झाला. वणी उपविभागातील नागरिकांना मुंबईसह राज्यातील व देशातील विविध ठिकाणी प्रवास करण्यासाठी एकही रेल्वेगाडी उपलब्ध करून देण्यात न आल्याने वणी उपविभागातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सध्यातरी वणीतून लांब टप्प्याची एकही रेल्वेगाडी नाही.
राज्यासह देशाच्या विविध ठिकाणी अनेक रेल्वेगाड्या या आठवडयापासून सुरू होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर वणी तालुक्यातून जाणारी व तालुक्यातील नागरिकांच्या उपयोगाची एकही रेल्वे गाडी सुरू न झाल्याने नागरिकांना दसरा व दिवाळी सणांमध्ये आपल्या घरी येण्यास खाजगी वाहनांचा हजारो रूपयांचा भुर्दंड उचलावा लागणार आहे. या सोबतच जे रुग्ण रुग्णालयात जातात किंवा कॅन्सरसह विविध आजारांसाठी मुंबई येथे जातात त्यांची यामुळे अतोनात गैरसोय झाली आहे.
वणी तालुका हा यवतमाळच्या पालकमंत्र्यांकडून नेहमीच दुर्लक्षित असा तालुका राहिला आहे. तरी चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील वणीत एकही रेल्वे सुरू झाली नसल्याने खासदार बाळू धानोरकर यांनी या बाबत योग्य तो पाठपुरावा करावा अशी अपेक्षा नागरिक बाळगून आहेत. तर मुंबई ते नागपूर अशी धावणारी नंदीग्राम एक्स्प्रेस ही गाडी क्रमांक 11401 /02 ही गाडी किमान मुंबई ते वणी अशी सोडण्यात यावी. ही गाडी सुरू झाली तर नागरिकांना खूप सोईस्कर अशी ही गाडी ठरणार आहे.
राज्यात येत्या 10 ऑक्टोबर पासून ज्या रेल्वेगाड्या सुरू करण्यात आल्या आहे व काही सुरू करण्यात येणार आहे. त्यात वणीहून धावणारी पूर्णा पटना, दीक्षाभूमी, ताडोबा, संत्राघाची एक्सप्रेस सुरू करून त्याच्या आधी नंदिग्राम एक्स्प्रेस या गाडीला वणीपर्यंत सुरू करण्याचे प्रयत्न झाले तरच ही गाडी दिवाळीपूर्वी नागरिकांना उपलब्ध होऊ शकते. त्यासाठी प्रचंड राजकीय इच्छाशक्ती लागणार आहे. ती इच्छाशक्ती दाखवून गाडी सुरू होते, की नाही याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)