मतदार जागृत नसल्याने आत्महत्याग्रस्त जिल्ह्याचा शिक्का – राज ठाकरे

वणीत राज ठाकरे यांची ठाकरी शैलीत चौफेर फटकेबाजी

निकेश जिलठे, वणी: आधी पांढ-या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या यवतमाळ जिल्ह्याची ओळख आता आत्महत्याग्रस्त शेतक-याचा जिल्हा म्हणून ओळख झाली आहे. ही जिल्ह्यातील प्रत्येक मतदाराला शरम वाटावी अशी बाब आहे. ज्या शेतक-यांनी आत्महत्या केली. त्याचा मुलगा पुढे काय करतो, त्याच्या रोजगाराचे काय, त्याची विधवा पत्नी काय करते, त्याच्या मुलीचे लग्न कसे होते याची माहिती कुणालाच नसते. कारण मतदारांनी याचा कधीही विचार केलेला नाही. तो जागृत नसल्याने जिल्ह्याच्या कपाळावर आत्महत्याग्रस्त शेतक-यांचा असलेला शिक्का अद्यापही पुसलेला नाही. ही ओळख पुसण्यासाठी मनसेला एक संधी द्या. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी लढणा-या राजू उंबरकर यांना निवडून द्या, असे आवाहन राज ठाकरे यांनी वणी येथील सभेत केले. भाषणात त्यांनी ठाकरी शैलीत चौफेर फटकेबाजी केली.

राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की संपूर्ण राज्यात जात पाहून उमेदवारी दिली जाते. ज्या जातीचे मतदार जास्त त्या जातीला उमेदवारी द्यावी असा आजार महाराष्ट्राच्या राजकारणाला लागला आहे. तुम्हाला आजार होतो तेव्हा तुम्ही चांगल्या डॉक्टरकडे जाता की जातीच्या डॉक्टरकडे. मग निवडणुकीच्या वेळी तुम्हाला चांगला उमेदवार पाहिजे की जातीचा. आजपर्यंत तुम्ही जातीच्या उमेदवारांना मत दिलं असेल. मात्र यापुढे विकाराचा आजार बरा होण्याकरीता तुम्हाला चांगला माणूस विधानसभेत पाठवायचा आहे. असेही ते म्हणाले.

आपल्या भागातील 95 टक्के भाग अद्यापही सिंचनाखाली आलेला नाही. आपण ज्या लोकांना निवडून दिले. त्यांनी कधीही या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही. बेरोजगारी वाढली आहे. तुम्ही काय खाणार, काय पिणार हे राजकारणी ठरवतात. विजचे भाव राजकारणी ठरवता. गॅस सिलिंडरचे भाव राजकारणी ठरवतात. शेतमालाचा भाव, बि बियाणांचा भाव राजकारणी ठरवतात. मात्र दरवेळी राजकारणी तुमची फसवणूक करतात आणि या फसवलेल्या राजकारण्यांनाच आपण दरवेळी निवडून देतो. जोपर्यंत आपण याकडे डोळसपणे पाहणार नाही. तोपर्यंत तुमची फसवणूक होतच राहणार, असे ते म्हणाले.

इकडचे राजकारणी या भागातून निवडणूक लढवतात. मात्र त्यांचे मुलं-मुली कुटुंब पुण्या मुंबईत राहतात. त्यांचे बंगले तिथे असते. असा आरोपही त्यांनी केला. पक्ष फोडाफोडी, धार्मिक स्थळावरील भोंगे यांवरही फटकेबाजी केली. अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसणे आवडत नाही असे म्हणणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मांडीवर अजित पवार बसले आहे. असे देखील ते म्हणाले. त्यांनी उद्धव ठाकरे व शिवसेनेवरही भाषणातून टिका केली.

वणी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राजू उंबरकर यांच्यासह वाशिम जिल्ह्यातील गजानन वैरागडे, सागर दुधाने, ब्रिजराम किंजर, प्रवीण सूर, गणेश बरबडे, अश्विन जयसवाल, संतोष चौधरी, संदीप कोरू, घनश्याम निखाडे, आदित्य दुरुगकर, सचिन भोयर, सुरेश चौधरी हे उमेदवार मंचावर उपस्थित होते. या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

Comments are closed.