राजा जायसवाल, श्रद्धा व काशी यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी अंत्यसंस्कार

नांदेपेरा रोडवरील जायसवाल यांच्या घरून स. 9 वाजता निघणार अंत्ययात्रा

बहुगुणी डेस्क, वणी: उत्तराखंड येथील केदारनाथ यात्रेसाठी गेलेल्या वणीतील जायसवाल कुटुंबीतील 3 व्यक्तींचे हॅलिकॉप्टर अपघातात दुर्दैवी निधन झाले होते. सोमवारी रात्री तिन्ही मृतदेह जायसवाल यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. आज मंगळवारी रात्री उशिरा दिल्ली हून त्यांचे पार्थिव वणीला आणले जाणार आहे. बुधवारी पहाटे तिन्ही पार्थिव नागपूर येथे तर सकाळी वणी येथे पोहोचणार आहे. बुधवारी सकाळी 9 वाजता जायसवाल यांच्या राहत्या घरून अंत्ययात्रा निघणार आहे. तर मोक्षधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

रविवारी दिनांक 15 जून रोजी पहाटे राजकुमार उर्फ राजा जायसवाल त्यांच्या पत्नी श्रद्धा व मुलगी काशी हे तिघे हेलिकॉप्टरने केदारनाथ दर्शनासाठी गेले होते. तिथून गुप्तकाशी येथे परतताना सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास त्यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले होते. यात हेलिकॉप्टरमधल्या सर्व 7 जणांचा मृत्यू झाला होता. अपघातात शरीर जळाल्याने डीएनएद्वारा मृतांची ओळख पटवण्यासाठी जायसवाल व बोरुले यांचे नातेवाईक रुद्रप्रयाग येथे गेले होते. काशी या चिमुकलीच्या मृतदेहाची सुस्थित असल्याने या मृतदेहाची ओळख आधीच पटली होती. मात्र इतर मृतदेह जळाल्याने याची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणीची गरज होती. 

मृतदेहाचे पोस्टमॉर्टम व डीएनए चाचणीची प्रक्रिया सोमवारी संध्याकाळपर्यंत पूर्ण झाली. त्यानंतर हे तिन्ही मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. तिन्ही मृतदेह रुद्रप्रयाग येथून सोमवारी रात्री दिल्ली येथे आणण्यात आले. आज सकाळी हे मृतदेह दिल्ली येथे पोहोचले. त्यानंतर आज रात्री उशिरा तिन्ही मृतदेह एअरलिफ्ट करून नागपूर येथे आणले जाणार आहे. पहाटे नागपूरहून खासगी वाहनाने हे मृतदेह वणी येथे आणले जाणार आहे. सकाळी 9 वाजता जायस्वाल यांच्या घरून अंत्ययात्रा निघणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

वणी मध्ये कोळसा व्यावसायिक, ट्रान्सपोर्टर व शिवभक्त म्हणून राजकुमार जयस्वाल यांची ओळख होती. वणीत प्रदीप मिश्रा यांचे शिवपुराण कार्यक्रम राजा जायसवाल यांच्याच पुढाकाराने झाला होता. अत्यंत कमी वयात एक व्यावसायिक म्हणून त्यांनी वणीत ओळख बनविली. त्यांच्या पहिल्या पत्नीचे देखील अपघाती निधन झाले होते. त्यानंतर राजा यांनी श्रद्धा बोरुले यांच्यासोबत विवाह केला. कुशी ही राजा व श्रद्धा यांचीच कन्या होती. तर पहिल्या पत्नीपासून त्यांना दोन मुले आहेत. जायसवाल कुटुबीयांच्या अपघाती निधनाच्या धक्क्यातून अद्यापही वणीकर सावरले नाहीत.

Comments are closed.