बहुगुणी डेस्क, वणी: वणी तालुक्यातील तीर्थक्षेत्र भांडेवाडा येथे दर महिन्याच्या 16 तारखेला विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. ब-याच वर्षांपासून सुरु असलेली ही परंपरा आजही त्याच उत्साहात सुरु आहे. येथे मोठ्या प्रमाणात भाविक येतात. मात्र त्यामुळे येथे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. त्याचा भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. दर महिन्याला येथे वाहतुकीची समस्या निर्माण होत असताना देखील वाहतूक विभाग मात्र ही समस्या सोडवण्यास अपयशी ठरत आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते शुभम पिंपळकर यांनी केला आहे. त्यांनी याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्फत पोलीस अधिक्षक यांना निवेदन देऊन ही समस्या तात्काळ सोडवण्याची मागणी केली आहे.
भांदेवाडा येथे महिन्याच्या 16 तारखेला भरणा-या काल्यानिमित्त परिसरातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. ऑटो, दुचाकी, कार, खासगी वाहन इत्यादी वाहनाने तर परिसरातील भाविक पायदळ येथे येतात. त्यामुळे एकाच वेळी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे वृद्ध, महिला, लहान मुले आणि अपघात किंवा आपत्कालीन सेवांसाठी रस्त्याचा उपयोग करणाऱ्यांना याचा मोठा त्रास होतो. विशेष म्हणजे, ही समस्या दर महिन्याला उद्भवते. असे असूनही वाहतूक विभाग याकडे सातत्याने दुर्लक्ष करत आले आहे, असा आरोप शुभम पिंपळकर यांनी केला आहे.
भांदेवाडा परिसरात वाहतुकीची विशेष व्यवस्था करण्यात यावी, मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून किमान 500 मीटर अंतरानंतरच ऑटोचालकांना वाहने उभी करण्यास परवानगी दिली जावी. वन-वे वाहतूक पद्धती सक्तीने राबवली जावी. अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे. जर याकडे संबंधीत विभागाने लक्ष दिले नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी दिला.
RN सोलर सिस्टीमचे गोडावून स्थानांतरण, आता हनुमान मंदिराजवळ जैन ले आउट येथे साधा संपर्क



Comments are closed.