राजूर येथे मजुराची गळफास घेऊन आत्महत्या

परिसरात सातत्याने आत्महत्या चिंचेचा विषय

बहुगुणी डेस्क, वणी: राजूर येथील एका इसमाने घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आज दुपारी 4.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. विजय घोडाम (42) असे मृतकाचे नाव आहे. विजय हा कॉलरी येथील वार्ड क्रमांक 3 मध्ये राहत होता. तो मिस्त्रीकाम करायचा, सध्या तो राजूर येथील एका चुना भट्ट्यावर काम करायचा. तर त्याची पत्नी देखील मजुरी करायची. आज शनिवारी दिनांक 15 जून रोजी दुपारी 2 वाजताच्या सुमारास तो घरी आला. त्यावेळी त्याचे मुलं बाहेर खेळत होते तर पत्नी कामावर गेली होती. घरी कुणी नसल्याची संधी साधत विजयने  गळफास घेऊन आत्महत्या केली. दुपारी 4 वाजताच्या सुमारास जेव्हा मुलं घरी आले तेव्हा ही घटना उघडकीस आली. मुलांनी ही माहिती शेजा-यांना दिली. त्यानंतर याची माहिती वणी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला व मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला विजयने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. मात्र विजयच्या आत्महत्येने त्याचे कुटुंबीय हादरुन गेले आहे. विजयच्या पश्चात पत्नी, 3 मुली, 2 मुले असा आप्त परिवार आहे. प्रकरणाचा पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

Comments are closed.