विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील राजूर कॉलरी येथे आठवडी बाजराची नियोजित जागा असतानाही येथील रहदारीच्या रस्त्यावर भरवला जात आहे. सध्या भगतसिंग चौकातील वेकोलिचे जड वाहन चालणाऱ्या रस्त्यावर दाटीदाटीने रविवारच्या आठवडी बाजार भरायला लागला आहे, प्रसंगी मोठ्या अपघाताची व सोशल डिस्टनसिंगचे पालन होत नसल्याने आरोग्याची समस्या सुदधा निर्माण होण्याची मोठी शक्यता आहे.
गेल्या कित्येक दशकांपासून राजूर येथे दर रविवारला आठवडी बाजार भरतो आहे. येथे दगडी कोळशाच्या खाणी, चुना दगडाच्या खाणी व मोठा चुना उत्पादन करणाऱ्या चुना कारखाने असल्याने येथील आठवडी बाजाराला मोठे महत्त्व आहे. ह्या राजूर गावाला १० ते १५ गावे जोडून असल्याने तसेच इथे मोठ्या प्रमाणात मजुरांची संख्या असल्याने येथील बाजारात मोठी आर्थिक उलाढाल होत असते.
एके काळी राजूरच्या बाजार गावातील बुद्धीविहारासमोरील मोठ्या मोकळ्या जागेवर भरायचा, परंतु ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षित धोरणामुळे हळूहळू त्या ठिकाणी भरपूर दुकानदारांनी अतिक्रमण करून पक्की दुकाने थाटल्यामुळे बाजारासाठी जागाच उरली नसल्याने आठवडी बाजाराचे अस्तित्वच धोक्यात आले होते, परिणामी ह्या आठवडी बाजाराला तेथून प्रथिमिक आरोग्य केंद्र शेजारी मोठी मोकळी जागा असलेल्या सरकारी जागेवर हलविण्यात आले.
पारंपरिक आठवडी बाजाराचे अस्तित्व धोक्यात
त्या ठिकाणी प्रशासनाने बाजाराला आवश्यक असलेल्या प्राथमिक गोष्टी जसे ओटे, रस्ते,विजेची व्यवस्था व पाणी ह्या मूलभूत गरजांची पूर्तता न केल्याने बाजारात दुकाने लावण्यासाठी आलेले व्यावसायिक मोठ्या कष्टात त्याठिकाणी आपला व्यवसाय करतात. पावसाळ्यात तर दुकानदारांना व गावातील जनतेला चिखल तुडवीत बाजार करावा लागतो. ह्याचा दुष्परिणाम असा होत आहे की राजूरच्या आठवडी बाजारात दुकाने लावण्यासाठी येणारे दुकान हळूहळू कमी व्हायला लागले आहेत आणि ह्यामुळे ह्या बाजाराचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
आठवडी बाजारात दुकाने लावणार्यांनी नियोजित जागेवर मूलभूत सुविधा नसल्याने येथील मुख्य चौक असलेल्या शहीद भगतसिंग चौकातील मुख्य जड वाहनांची रहदारी असलेल्या रस्त्यावर दुकाने लावायला सुरुवात केली आहे. ह्याकडे राजूर ग्रामपंचायतीचे पूर्णतः दुर्लक्ष असून राजूर गावाची मुख्य शान असलेले आठवडी बाजार मात्र अस्तित्वाची लढाई लढत आहे. आता या कडे प्रशासन, लोकप्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते काय करतील याकडे जनतेचे लक्ष लागलेले आहे.
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)