हरियाणातील ‘लाईव्ह हनुमान’ यंदाच्या रामनवमी शोभायात्रेत- अध्यक्ष रवी बेलुरकर

राम नवमी उत्सव समिती तर्फे 6 एप्रिलला शोभायात्रेत होईल आकर्षणांची बरसात

बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील रामनवमी शोभायात्रेचं आकर्षण आणि प्रतीक्षा सर्वांनाच असते. यातील देखावे आणि प्रयोग सर्वांनाच भुरळ घालतात. दरवर्षी काहीतरी नवीन आणि हटके हे या शोभायात्रेचं वैशिष्य. या वर्षीदेखील रविवार दिनांक 6 एप्रिलला प्रभू श्रीराम नवमी उत्सव शोभायात्रा समिती तर्फे भव्य दिव्य शोभायात्रा काढणार आहे. अनेक वर्षांपासून वणीमध्ये ही परंपरा कायम आहे. प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवानिमित्त वणी येथे रामरथ काढला जातो.

या शोभायात्रेमध्ये विविध आकर्षक देखावे असणार आहेत. अयोध्येतील रामलल्लांची देखणी मूर्ती, श्रीकृष्ण, भगवान शंकर आणि हनुमान यांच्या मूर्ती विशेष आकर्षण ठरणार आहेत. तसेच वणी शहराला भजनांनी मंत्रमुग्ध करण्यासाठी शेगावच्या श्री गजानन महाराज देवस्थानच्या भजन मंडळीसह विविध ठिकाणांहून आलेली भजनी मंडळी आपली कला सादर करणार आहेत.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

याशिवाय, रामरथ, रामपालखी, घोडे, विविध बँड पथके अशा विविध पालख्यांसह ही शोभायात्रा निघणार आहे. विशेष आकर्षण म्हणून हरियाणातील ‘लाईव्ह हनुमान’ देखील या शोभायात्रेत सहभागी होणार आहे.6 एप्रिल रोजी संपूर्ण वणी शहर भगवामय होईल. चौका-चौकांत रांगोळ्यांनी सजावट केली जाईल. जुन्या स्टेट बँकेजवळील राम मंदिर येथे संध्याकाळी 5 वाजता प्रभू श्रीरामांच्या रामरथाचे पूजन करून शोभायात्रेला सुरुवात होईल.

ही शोभायात्रा राम मंदिर (जुनी स्टेट बँक) येथून सुरू होऊन श्याम टॉकीज चौक, काळाराम मंदिर मार्ग, श्री रंगनाथ स्वामी मंदिर चौक, भगतसिंग चौक, गाडगेबाबा चौक, सर्वोदय चौक, टागोर चौक, तुटी कमान, गांधी चौक, खाती चौक, टिळक चौक, आंबेडकर चौकमार्गे पुन्हा राम मंदिर येथे पोहोचेल. महाआरतीने शोभायात्रेचा समारोप होईल. या शोभायात्रेत मोठ्या संख्येने रामभक्तांनी सहभाग घ्यावा, अशी विनंती श्री प्रभू राम नवमी उत्सव समितीचे अध्यक्ष रवी बेलुरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

Comments are closed.