सुनील इंदुवामन ठाकरे. पंढरपूर: पंढरपूर येथील विश्वप्रसिद्ध कैकाडी महाराज विश्वपुण्यधामचे प्रमुख ह.भ.प. रामदास महाराज जाधव (77) यांची प्राणज्योत मालवली. अकलूज येथील एका खाजगी दवाखान्यात शुक्रवारी सायंकाळी चार, साडेचार वाजताच्या सुमारास त्यांचे आजाराने निधन झाले. अलीकडे त्यांचा न्युमोनिया आणि ब्लडप्रेशरचा त्रास वाढला होता.
त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सुना, पुतणे, नातवंड असा खूप मोठा आप्तपरिवार आहे. कैकाडी महाराज उपाख्य राजाराम महाराज यांचे कोंडिराम काका हे भाऊ. कोंडिराम काकांना रामदास, वाल्मिक आणि तुळशीदास ही तीन मुलं. यातील रामदास महाराजांनी पुढे कैकाडी महाराज आणि कोंडिराम काकांची कीर्तन आणि प्रबोधनाची परंपरा चालवली.
यांचं मूळ गाव मनमाडजवळील मांडवगण. तेथेच रामदास महाराजांचा जन्म झाला. कोंडिराम काका हे पंढरपूरची दंडवतयात्रा करीत. तेव्हा रामदास महाराज आई शांताईंसोबत या यात्रेत कोंडिरामकाकांसह असत.
गाडगेबाबांची परंपरा पुढे कोण चालवणार
गाडगेबाबांची महत्वाची विचारपरंपरा आणि वारकरी संप्रदायाचं तत्त्व पंढरपुरात काहींनी टिकवून ठेवलं. त्यातील एक महत्वाचं नाव कैकाडी महाराज. त्या परंपरेतलेच रामदास महाराज. लहानपणापासून त्यांनी कैकाडी महाराज आणि गाडगेमहाराज यांना जवळून अनुभवले. ते यांची परंपरा जाणत होते. रामदास महाराजांनी तो विद्रोह आणि बंडखोरी टिकवून ठेवली. आपल्या कीर्तनांतून गाडगेबाबास्टाईल ते प्रबोधन करीत. ते विचार वारकऱ्यांपर्यत नेण्याचं काम रामदास महाराज नेटानं करीत. कैकाडी बाबांची, गाडगेबाबांची परंपरा पुढे कोण चालवणार हा प्रश्न आहे. ह.भ.प. रामदास महाराज यांना आदरांजली.
सचिन परब
संपादक, रिंगण वार्षिकांक
००००००००००००००००००००००चळवळीची मोठी हानी
वडील चिंधे महाराजांना रामदास महाराज गुरूबंधू मानत. आम्ही दरवर्षी त्यांना भेटायला पंढरपूरला जायचो. नव्या काळात रामदास महाराजांनी संत तुकोबारायांसारखी क्रांतीची वाट धरली. ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही’ या उक्तीप्रमाणे त्यांनी कार्य केलं. अंधश्रद्धा आणि अनिष्ट रूढींवर घणाघाती प्रहार केलेत. अनेकांना व्यसनमुक्त केले. त्यांचं जाणं म्हणजे वारकरी धर्म आणि सामाजिक चळवळीची खूप मोठी हानी आहे.
संतोष कुंडकर
ह.भ.प. चिंधे महाराजांचे चिरंजीव
(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)