सर आली धावून, योजना गेली वाहून

रांगणा घाटावरची जलवाहिनी, पंपाला पुराचा फटका

0

बहुगुणी डेस्क: वणीकरांना पाणीसमस्येला तोंड द्यावे लागत असल्याने तब्बल 15 कोटी रुपये खर्च करून सुरू केलेल्या पाणीपुरवठा योजनेवर ‘पाणी’ फिरल्याचे दिसत आहे. पावसामुळे आलेल्या पुरात जलवाहिनी वाहून गेली आहे. तसेच पाणी ओढण्यासाठी लावण्यात आलेले पंप देखील तिथे नसल्याचे दिसून येत आहे. हे पंप वाहून गेल्याचा अंदाज बांधला जातोय. त्यामुळे रांगणा घाटावरचे पाणी वणीकरांना मिळण्यास आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

या वर्षी अनेक वर्षांनंतर वणीकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागला. उन्हाळ्यात ही परिस्थिती आणखी गंभीर होईल म्हणून 15 कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. सुमारे 15 किमी अंतरावरून रांगणा घाटावरून पाणी आणण्याच्या कामाला सुरूवात झाली. उन्हाळ्यात या योजनेद्वारे वणीकरांना पाणी देण्याचा दावा करण्यात आला होता. मात्र हा दावाही फोल ठरला. उन्हाळ्यात या योजनेचे पाणी काही वणीकरांना मिळाले नाही.

पावसाळ्यातरी पाणी मिळेल या आशेवर वणीकर होते मात्र पुरामुळे वडगाव जवळील कुडांच्या नाल्यातून टाकण्यात आलेली तिन्ही पाइपलाइन पुरात वाहून गेली. तसेच रांगणा घाटावर टाकण्यात आलेले सुमारे 10 लाख किमतीचे पंपही पुरात वाहुन गेल्याचे दिसत आहे.

या जलवाहिनीची दोन तीनदा ट्रायल घेण्यात आली होती. मात्र मध्ये पाईप लिक झाल्याचे समोर आल्याने ही ट्रायल देखील फसली. गेल्या चार दिवसांपासून परिसरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे या योजनेचे उर्वरीत काम ठप्प आहे. त्यातच आता पुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे वणीकरांना वर्धा नदीचे पाणी मिळणार की निर्गुडेचे यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार.

Leave A Reply

Your email address will not be published.