स्वातंत्र्याच्या सत्तरी नंतरही सावंगीवासी भोगतय मरणयातना

नदी-ओढ्याच्या पुरामुळे सावंगीवासीयांचे हाल

0

विलास ताजने, (मेंढोली): गरज नसताना शहरात मेट्रोसाठी खर्च केला जातोय. शहर स्मार्ट होत आहे. मात्र हाडामासाची माणसं राहणार एक गाव स्वातंत्र्याची सत्तरी पार करूनही जिवंतपणी मरणयातना भोगत आहे. ही कहाणी कुण्या एका दुर्गम भागातील गावाची नसून तालुक्याच्या ठिकाणापासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावर असलेल्या सावंगी (लहान) या गावाची आहे.

वणी तालुक्यात वणी-घुग्गुस हायवेवर नायगावपासून पाच किलोमीटर अंतरावर सावंगी (लहान) हे गाव आहे. ६५ ते ७० घरं असणार हे छोटसं गाव आहे. गावाची लोकसंख्या ३५० च्या घरात. गावचा मुख्य व्यवसाय शेती. गावाच्या उत्तर-पूर्व दिशेने निर्गुडा नदी वाहते. तर पश्चिम-दक्षिण दिशेकडून कुर्ली बंदीतून वाहणारा मोठा ओढा वाहतो.

पावसाळ्यात वणी विभागातील लहान-मोठ्या नदी ओढ्यांना पूर येताच सदर गावालाही पुराचा वेढा पडतो. त्यामुळे मोठी सावंगी व शेवाळा या शेजारी गावांचाही संपर्क तुटतो. परिणामी ग्रामस्थांना जीव मुठीत धरून जीवन जगावे लागते. मूलभूत सुविधा पासून वंचित राहावे लागत आहे. अनेक दिवसांपासून नदीवर पूल बांधकामाची मागणी धूळ खात आहे. परिणामी स्पर्धेच्या युगात सदर गावाचा विकास ठप्प झाला आहे.

गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाममात्र
पावसाच्या दिवसात शाळेला अघोषित सुट्टी असते. शिक्षक वणी वरून शाळेत ये-जा करतात. सध्या पुरामुळे शिक्षक-विध्यार्थ्यांची शाळेला बुट्टी आहे. आता सात दिवस झालेत गावातील शाळा बंद आहे. उच्च प्राथमिक आणि पुढील शिक्षणासाठी विध्यार्थ्यांना बाहेर गावी ये-जा करावी लागते. काही मुले-मुली आपापल्या नातेवाइकांकडे राहून शिक्षण पूर्ण करतात. तर काहीच आधार नसणाऱ्यांना शिक्षण घेण्याची इच्छा असतानाही शिक्षण अर्ध्यावरच सोडावे लागते. त्यामुळे गावातील अर्ध्यापेक्षा अधिक लोक  नॉन मॅट्रिक असल्याची माहिती आहे.

बंद असलेली शाळा

शेतात किंवा गावात दुर्दैवाने विजा पडणे, सर्पदंश होणे अशा काही घटना घडल्यास किंवा आजारी व्यक्तीला योग्य वेळी उपचार न मिळाल्यास अघटित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिंदोला आणि घुगूस येथील बाजारपेठ, शाळा-कॉलेज सात-आठ किमी अंतरावर आहे. परंतु पुरामुळे सर्व व्यवहार ठप्प होतात.

दैनंदिन गरजा भागविण्यासाठी वेळप्रसंगी गावातीलच शेजाऱ्या-पाजाऱ्यांची मदत घ्यावी लागते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना शेती उपयोगी साहित्य खरेदी करावं लागतं. अर्थातच नाइलाजास्तव हलाखीच जीवन जगण्याची जणू सवयच ग्रामस्थांच्या अंगवळणी पडल्याचं दिसून येते.

लोकप्रतिनिधी देणार का लक्ष ?

निवडणूकांच्या तोंडावर लोकप्रतिनिधी भली मोठी आश्वासन देऊन जातात. मात्र निवडणूका होताच दिलेली आश्वासने हवेतच विरून जाते. पुन्हा पाच वर्षे कुण्या नेत्या पुढाऱ्यांची पाऊल गावाकडे फिरकत नाही. तरी सुद्धा गावातील बालक, युवक आणि वृद्ध मानवी संवेदना असणार कुणीतरी आपलं माणूस गावाचा विकास करण्यासाठी आशेचा किरण बनून येण्याची रोज वाट पहातये. याआधी ही आमदार, खासदार यांनी पुलाबाबत आश्वासने दिली होती. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही.

गावातील रहिवाशी वणी बहुगुणीशी म्हणाले की…..

पूल नसल्याने पावसाळ्यात शाळा बरेचदा बंदच असते. त्यात नदी, नाला पार करून गावात यावं लागत असल्याने शिक्षकही शाळेत येत नाही. त्यामुळे गावाचं मोठं शैक्षणिक नुकसान झालं आहे. शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांची लिंक तुटते याचा परिणाम असा झाला की गावात 70 टक्के लोक नॉन मॅट्रिक आहे. माझी आजी आजारी आहे तिला वणीला उपचारासाठी घेऊन जायचे आहे, मात्र रस्ता बंद असल्याने ती सध्या घरीच आहे. शेतक-यांचा भाजीपाला आणि दूधही घरीच पडून आहे. ते होणारं नुकसान वेगळंच आहे. – हेमंत ढवस, शेतकरी सावंगी (लहान)

लिंकवर क्लिक करून पाहा व्हिडीओ…

Leave A Reply

Your email address will not be published.