मतदानाची कमी टक्केवारी कोणाच्या पथ्यावर ?

मतमोजणीला सुरवात, सायंकाळ पर्यंत निकाल स्पष्ट

जितेंद्र कोठारी, वणी : रंगनाथ स्वामी नागरी सहकार पतसंस्थेच्या संचालक मंडळासाठी रविवार 26 जून रोजी पार पडलेल्या मतदानाची आज मतमोजणी होत आहे. येथील बाजोरिया हॉलमध्ये सकाळी 10 वाजता पासून मतमोजणीला सुरवात झाली. या निवडणुकीत फक्त 38 टक्के मतदान झाले असून मतदानाची कमी टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडणार ? हे आज सायंकाळ पर्यंत स्पष्ट होईल.

रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष ऍड. देविदास काळे यांचे जय सहकार पॅनल आणि माजी आमदार वामनराव कासावार समर्थीत परिवर्तन पॅनलमध्ये अत्यंत अटीतटीच्या या निवडणुकीत रंगनाथचे ‘स्वामी’ कोण होईल हे औत्सुक्यचे ठरणार आहे. दोन्ही पॅनलचे उमेदवार आमचाच पॅनल निवडून येणार, असा दावा करीत असले तरी रंगनाथ पतसंस्थेमध्ये ऍड.काळे यांची बाजू भक्कम असल्याचे मत सहकार क्षेत्रातील काही जाणकारांनी व्यक्त केले आहे.

यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात 14 शाखा, 55 हजार सभासद, तब्बल 800 कोटींची ठेवी असलेल्या या पतसंस्थेवर ताबा मिळविण्यासाठी दोन्ही पॅनलमध्ये चुरशीची लढत झाली होती. रंगनाथ स्वामी पतसंस्थेच्या इतिहासात पहिल्यांदा सर्वच राजकीय पक्षाचे स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते दोन्ही पॅनलकडून प्रचारार्थ उतरले होते. वणी विधानसभा काँग्रेस पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे परिवर्तन पॅनेलचे समर्थन केले. तर शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी उघडपणे ऍड. काळे यांचे जय सहकार पॅनेलच्या बाजूने कार्य केले.

Comments are closed.