रंगनाथ स्वामी निवडणुकीत अ‍ॅड. काळे गटाचा एकहाती वरचष्मा

अटीतटीच्या निवडणुकीत मिळविले एकतर्फी विजय.. माजी आमदार वामनराव कासावार यांच्या प्रयत्नाला अपयश

जितेंद्र कोठारी, वणी : येथील प्रतिष्ठित रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळ निवडणुकीत विरोधी परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडवित जय सहकार पॅनलचे सर्व 17 उमेदवार निवडुन आले. अटीतटीच्या या निवडणूकीत संस्थेचे विद्यमान अध्यक्ष अ‍ॅड. देविदास काळे यांनी एकहाती सत्ता मिळवून वर्चस्व सिद्ध केले आहे. संस्थेच्या 17 जागांसाठी रविवारी झालेल्या मतदानाची सोमवारी बाजोरिया हॉलमध्ये मतमोजणी झाली.

रंगनाथ स्वामी नागरी सह.पतसंस्थेवर मागील 20 वर्षांपासून अ‍ॅड. काळे गटाचा ताबा आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीत काही विद्यमान संचालक व माजी संचालकांनी बंडखोरीचा पावित्रा घेऊन अ‍ॅड. काळे याना आव्हान दिले. विरोधी गटाला माजी आमदार वामनराव कासावार यांनी पाठिंबा दिला. त्यामुळे निवडणूक आणखी चुरशीची झाली होती. मात्र या निवडणुकीत जय सहकार पॅनेलच्या दणदणीत विजयामुळे माजी आमदार वामनराव कासावार यांचा रंगनाथ स्वामी पतसंस्था कांग्रेस च्या ताब्यात घेण्याच्या प्रयत्नाला यश मिळाले नाही.

सोमवार 27 जून रोजी सकाळी 11 वाजता पासून सुरु झालेल्या मतमोजणीत जय सहकार पॅनलच्या उमेदवारांनी सुरवातीपासून आघाडी घेतली होती. मतमोजणीच्या सर्व तीन फेऱ्यानंतर जय सहकार पॅनलचे अ‍ॅड.देविदास काळे यांना 6948 मत, विवेकानंद मांडवकर 6726, सुधीर दामले 6635, हरिशंकर पांडे 6561, लिंगारेड्डी अंडेलवार 6553, पुषोत्तम बद्दमवार 6454, गोपाळराव पिंपलशेंडे 6613, रमेश भोंगळे 7377, सुरेश बरडे 7378, उदय रायपुरे 7209, अरविंद ठाकरे 6653, घनश्याम निखाडे 6711, परीक्षित एकरे 6822, चिंतामण आगलावे 6610, सुनील देठे 6524, निमा जीवणे 7031 आणि छाया ठाकुरवार यांना 6564 मते मिळून सर्व उमेदवारांना विजयी घोषित करण्यात आले

निवडणूक निकालानंतर सर्व विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व गुलाल उधळून विजयी मिरवणूक काढली. पतसंस्थेच्या अध्यक्ष पदावर अ‍ॅड.देविदास काळे यांची अविरोध निवड होईल यात काही दुमत नाही. निवडून आलेले इतर संचालक पतसंस्थेच्या सभासदांच्या विश्वासावर खरे उतरणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जय सहकार पॅनलच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी  राजू उंबरकर, संजय देरकर, सुनील कातकडे, राजाभाऊ पाथर्डकर, विजय चोरडिया, राकेश खुराना, भास्कर गोरे यांनी महत्वाची भूमिका बजावली. 

Comments are closed.