संतापजनक: 6 वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून नराधमाचा अत्याचार

रात्री बेपत्ता झालेली बालिका पहाटे आढळली शेतातील काटेरी झुडुपात.... घटनेने हादरला मारेगाव तालुका

जितेंद्र कोठारी, वणी: मारेगाव तालुक्यात एका 30 वर्षीय नराधमाने एका सहा वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आजीसोबत शौचास गेलेली चिमुकली रात्री बेपत्ता झाली होती. तेव्हापासून संपूर्ण गाव चिमुकलीच्या शोधात होते, अखेर पहाटे ती जखमी अवस्थेत शेतातील एका काटेरी झुडुपात आढळून आली होती. या प्रकरणी पोलिसांनी अपहरण करून अत्याचार करणा-या आरोपी नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहे.  

सविस्तर वृत्त असे की, पीडित चिमुकली ही मारेगाव तालुक्यातील एका गावातील रहिवाशी आहे. सोमवारी दिनांक 9 मे रोजी गावात एक कार्यक्रम असल्याने गावातील अधिकाधिक लोक या कार्यक्रमात सहभागी झाले होते. रात्री 9 वाजताच्या सुमारास पीडिता शौचासाठी आजीसोबत बाहेर गेली. दरम्यान बराच वेळ झाला तरी नात परत न आल्याने आजीने नातीला आवाज दिला. मात्र नातीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आजीने जाऊन बघितले असता तिथून चिमुकली नात बेपत्ता झालेली दिसली. जवळपास शोधाशोध केल्यावरही चिमुकली आढळून न आल्याने आजीने घरी येऊन ही बाब चिमुकलीच्या वडिलांना सांगितली.

चिमुकली बेपत्ता झाल्याचे कळताच गावात एकच खळबळ उडाली. सोमवारी रात्री अख्खं गाव मोटारसायकल, टॉर्च, लाठी काठी घेऊन चिमुकलीच्या शोधाकार्यात लागले. संपूर्ण परिसर पिंजून काढल्यावरही त्यांना चिमुकली आढळून आली नाही. अखेर पहाटे 3 वाजताच्या सुमारास गावाजवळ असलेल्या एका शेतशिवारातील काटेरी झुडुपात चिमुकली बेशुद्ध व रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आली. पीडितेला तात्काळ उपचारासाठी वणी येथील एका रुग्णालयात आणण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार करून तिला यवतमाळ येथे पुढील उपचासाठी नेण्यात आले. दरम्यान तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलीस व तिच्या कुटुंबीयांनी चिमुकलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता जे सत्य समोर आले ते सर्वांनाच हादरवून ठेवणारे होते.

True Care

आरोपीही होता शोधमोहीमेत
चिमुकली शौचास गेली असता आरोपीने अंधाराचा फायदा घेत तिचे अपहरण केले. चिमुकलीला एका ओसाड जागी नेऊन आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर आरोपीने पीडितेला परिसरातील एका काटेरी झुडुपात टाकले व तिथून तो गावात परत आला. दरम्यान आरोपीला चिमुकलीसाठी शोधमोहीम सुरू असल्याचे कळताच तो देखील या शोधमोहीमेत सामिल झाल्याची माहिती मिळाली आहे.

अत्याचार झाल्याचे उघडकीस येताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. दरम्यान बिंग फुटण्याच्या भीतीने आरोपी गावातून पसार झाला. मोबाईलच्या लोकेशनवरून पोलिसांनी शोध घेतला असता त्यांना तो वडकी येथे असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी वडकी, ता. राळेगाव येथे जाऊन शिताफीने आरोपीला अटक केली.

या प्रकरणाने संपूर्ण मारेगाव तालुका हादरला आहे. या प्रकरणी आरोपी मारोती मधुकर भेंडाळे (वय 30) याच्या विरोधात भादंविचे कलम 363 व 376 सहकलम पोक्सो (लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा) 4 व 6  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

प्रियकराच्या प्रेमाला चांगलाच बहर, प्रेयसी गर्भवती होताच हात वर

डोर्ली मर्डर मिस्ट्री: एक संशयीत ताब्यात

Comments
Loading...
error: कॉपी करू नका, बातमी आवडल्यास शेअर करा !!