वणीत आढळला अती दुर्मिळ गजरा साप (स्मूद स्नेक)

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीतील साई नगरी येथे अत्यंत दुर्मिळ असा गजरा साप आढळला. सर्पमित्र हरीश कापसे व त्यांच्या सहका-यांनी या सापाला रेस्क्यू केले. यवतमाळ जिल्ह्यात हा साप पहिल्यांदाच आढळला आहे. गजरा साप लाजाळू गटात मोडत असल्याने हा साप मानवी वस्तीपासून कायम दूर राहतो. या सापाला पकडून शहराबाहेर सोडून देण्यात आले आहे.

20 एप्रिल रोजी सकाळी साईनगरी येथील पार्कमध्ये साप असल्याचा कॉल सर्पमित्र हरीष कापसे यांना आला. त्यांनी तातडीने आपले सहकारी सर्पमित्र अर्जुन राठोड, गजानन क्षीरसागर, जगदीश आत्राम, सुजल मेश्राम, अविनाश हिवलेकर यांना सोबत घेतले व दुपारी ते साई नगरी येथे पोहोचले. दरम्यान त्यांना झुडुपात साप असल्याची माहिती कामगारांनी दिली. सर्पमित्रांनी झुडुपात बघितले असता ते सर्व आश्चर्यचकीत झाले. कारण अतिशय दुर्मिळ असलेला गजरा साप तिथे होता. सर्पमित्रांनी लगेच सापाला पकडले व या दुर्मिळ सापाची माहिती वनविभागाला दिली.

गजरा साप याचे इंग्रजीत स्मूद स्नेक असे नाव आहे. हा साप मुलायम व चमकदार असतो त्यामुळे याला चिकना साप देखील म्हटले जाते. हा साप लाजाळू गटात मोडतो. या सापाची लांबी ही अधिकाधिक 21 इंची असू शकते. साई नगरी येथील साप 9 इंचाचा आहे. या सापाचे मुख्य खाद्य हे सुरळी, पाल, सरडा, लहान बेडूक इत्यादी आहे. या सापाचे तोंड टोकदार असते तर शेपटी लांब असते. डोके माने पेक्षा किंचित रुंद असते, या सापाचा रंग हलका गडद तपकिरी असतो. तर पोट पांढरे असते.

हा साप भारतात केवळ महाराष्ट्रातील काही ठिकाणी तर छत्तीसगड येथे एका ठिकाणी आढळून आला आहे. त्यामुळे या सापाबाबत खूप कमी माहिती उपलब्ध आहे. वनविभागाच्या मदतीने या सापाला शहराबाहेर असलेल्या वनविभागाच्या जागेत सोडून देण्यात आले. एका दुर्मिळ सापाला जीवदान मिळाल्याने सर्पमित्रांचे कौतुक होत आहे. परिसरात साप निघाल्यास हरीश कापसे 9373462024 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments are closed.