प्रेमात पडून हाताशी धरला ‘यार’, नव-याच्या हत्याकांडात बायकोच सूत्रधार

रासा हत्याकांडात मृतकाच्या पत्नीला ठोकल्या बेड्या

जितेंद्र कोठारी, वणी: रासा येथील नीलेश चौधरी (32) हत्याकांडात आता धक्कादायक बाब समोर आली आहे. सदर हत्येची मुख्य सूत्रधार ही मृत नीलेशची पत्नी सपना हीच असल्याचे समोर आले आहे.  या प्रकरणी पोलिसांनी सपना नीलेश चौधरी (23) राहणार रासा हिला आज अटक केली. अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या नव-याचा काटा काढून प्रियकरासोबत सुखी संसाराचे स्वप्न रंगवणा-या सपनाचे स्वप्नच आता भंगलं आहे. नव-याच्या हत्याकांडात तिच सूत्रधार असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या. तिची प्रेम कहाणी अधूरी ठरली असली तरी नव-याचा मात्र जीव गेला. “पती, पत्नी और वोह” नावाचे दोन सिनेमे येऊन गेले. मात्र या दोन्हीत पती पत्नीच्या मध्ये “वोह” म्हणजे स्त्री होती. मात्र इथे “वोह” हा पुरुष होता. या हत्याकांडाला लव्ह ट्रॅन्गलचा ऍन्गल असू शकतो ही शंका पोलिसांना आधीपासूनच होती, अखेर ही शंका खरी ठरली. या प्रकरणी याआधीच मृतकाच्या पत्नीच्या प्रियकरासह आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आली होती व एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले होते. विशेष म्हणजे मृत नीलेशला येत्या काही दिवसात नोकरी लागणार होती. मात्र त्याआधीच त्याची हत्या झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात होती.

सविस्तर वृत्त असे की नीलेश सुधाकर चौधरी रा. रासा हा 27 ऑगस्ट रोजी बेपत्ता झाला होता. दिनांक 29 ऑगस्ट रोजी रासा जवळील फुलोरा जंगलात नीलेशचा मृतदेह फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यावरून हत्या की आत्महत्या हा मोठा प्रश्न पोलिसांपुढे उभा होता. तपासा अंती 16 सप्टेंबर गुरुवारी पोलिसांना ही हत्या असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी तातडीने 4 आरोपींना अटक करत एका विधीसंघर्ष बालकाला ताब्यात घेतले. यात चंद्रशेखर गोसाई दुर्गे (32), आशिष बाबाराव पिदूरकर (25), गौरव कैलास दोरखंडे (22), योगेश विद्याधर उघडे (20) व एक विधिसंघर्ष बालक यांचा समावेश होता. त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान पोलिसांना यात मुख्य सूत्रधार ही आरोपीची पत्नी सपना असल्याचे समोर आले. पोलिसांनी आज तातडीने सपनाला अटक केली. तिला सध्या न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

हत्येचे कारण काय?
चंद्रशेखर दुर्गे (33) रा. रासा याचे मृतक नीलेशची पत्नी सपना हिच्यासोबत अनैतिक संबंध होते. चंद्रशेखर हा सपनाचा नातेवाईक होता. त्यामुळे त्याचे नीलेशच्या घरी नेहमी येणे जाणे सुरू असायचे. त्यामुळे त्यांच्या संबंधाबाबत कुणालाही संशय येत नव्हता. मात्र हत्येच्या एक आठवड्याआधी पत्नीच्या अनैतिक संबंधाबाबत नीलेशला माहिती झाली. यावरून दोघांमध्ये वाद झाला व नीलेशने पत्नी सपनाला माहेरी पाठवले. याचा सपनाला राग आला व तिने खुनाचा प्लान रचला. तिने प्रियकर चंद्रशेखर दुर्गे याला याबाबत कल्पना दिली. जर आत्महत्येचा बनाव करून नीलेशची हत्या केल्यास आपल्या दोघांमध्ये कोणताही अडसर राहणार नाही असे सांगून सपनाने प्रियकर चंद्रशेखरला राजी केले.

चंद्रशेखर याने आपले तीन सहकारी आशिष बाबाराव पिदूरकर (25), गौरव कैलास दोरखंडे (22), योगेश विद्याधर उघडे (20) व एक विधिसंघर्ष बालक यांना सोबत घेतले व प्लान यशस्वी करण्याचे ठरवले. त्यासाठी त्यांनी फुलोरा जंगलाची जाग निवडली. या ठिकाणी कुणी येत नसल्याने ही जागा त्यांच्यासाठी सोयीस्कर होती. 27 ऑगस्ट रोजी आरोपी चंद्रशेखर याने नीलेशला या ठिकाणी बोलावून घेतले. तिथे तो आल्यावर त्यांनी तिथे दारूची पार्टी आयोजित केली. या पार्टीत त्यांनी नीलेशला दारू पाजली. त्यानंतर त्यांनी नीलेशची गळा आवळून हत्या केली व नीलेशने गळफास घेऊन आत्महत्या केली असा बनाव केला. दोन दिवसांनी हे हत्याकांड उघडकीस आले. मृत नीलेशच्या अंगावर काही ठिकाणी खरचटल्याच्या खुणा असल्याने आधीपासूनच पोलिसांनी या प्रकरणी हत्येच्या ऍन्गलने तपास सुरु केला होता.

सदर आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. डीबी प्रमुख आनंदराव पिंगळे यांनी याचा तपास करीत चार आरोपी व एक विधीसंघर्ष बालकाला अटक केली. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडीत त्यांना खून जरी चंद्रशेखर याने आपल्या सहका-यासोबत मिळून केला असला, तरी यात मुख्य सूत्रधार ही सपना असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आज आरोपी सपना नीलेश चौधरी हिला अटक केली. विशेष म्हणजे काही दिवसांनीच मृतक नीलेश याला वेकोलिमध्ये नोकरी लागणार होती. मात्र त्याआधीच त्याची हत्या झाली.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, उपविभागीय पोलिस अधिकारी शाम संजय पूज्जलवार, ठाणेदार शाम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी प्रमुख आनंदराव पिंगळे, एपीआय माया चाटसे, सुदर्शन वनोळे, सुनील खंडागळे, हरेंद्र भारती, पंकज उंबरकर, दीपक वांड्रसवार, विशाल गेडाम, शंकर चौधरी, मोहम्मद वसीम आदींनी केली.

हे देखील वाचा-

रस्ता नसल्याने चिखल तुडवत जावे लागते अंत्ययात्रेला

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.