रवि ढुमणे, वणी: वणी पोलिसांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या रसोया प्रोटीन लिमिटेड कंपनीतून चोरट्यानी तीस बॅटरी चोरी केल्याची तक्रार ठाण्यात दिली होती. त्यावरून ठाणेदार बाळासाहेब खाडे व डीबी पथकाने चोरट्यांचा शोध घेऊन सहा जणांना अटक केली आहे. या चोरीच्या माहिती इतर ठाण्यांना मिळताच ते आरोपींना ताब्यात घेण्यासाठी न्यायालयात उपस्थित होते.
शहरालगत असलेली रसोया प्रोटिन्स कंपनी सध्या बंद अवस्थेत आहे. येथील उत्पादन सुद्धा बंद झालेले आहे. मोजकेच लोक इथे कामे करतात. रसोया प्रोटिन्स कंपनीत लागून असलेल्या 30 बॅटरीची चोरी झाली असल्याची तक्रार व्यवस्थापक गोविंद झोडे यांनी पोलिसांत दाखल केली होती. त्यावरून ठाणेदार बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाचे सुदर्शन वानोळे , शेख नफिस,सुनील खंडागळे,सुधीर पांडे,रत्नपाल मोहाडे, दीपक वांड्रसवार, अमित पोयाम यांनी तपासाला सुरुवात केली होती.
भंगार चोरट्यांचा मागावर असतांना पोलिसांना सुगावा लागला. त्यांनी संशयित म्हणून राकेश नागेश्वर डोनेवार,रंगनाथ नगर, जितेंद्र उर्फ जितेश महादेवराव डहाके लालगुडा, समीर शेख अमीर शेख रंगनाथ नगर, नरेश गंडुजी घोगरे गोकुलनगर, गणेश सुभाष मांढरे रंगनाथ नगर यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी बॅटरी चोरी केल्याची कबुली दिली.
सदर बॅटरी व साहित्याचे तुकडे करून ते पोत्यांमध्ये भरून जत्रा मैदान भागातील बिलाल खान युसुफ खान याला विकल्याचे कबूल केले. तेव्हा पोलिसांनी बॅटरी विकत घेणारा बिलाल यालाही ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता तीन लाखांचा मुद्देमाल व चोरीसाठी वापरण्यात आलेला आटो क्रमांक एम एच 29 व्ही 9160 किंमत अंदाजे एक लाख रुपये हस्तगत केला आहे. विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत बॅटरी चोरी प्रकरणे प्रलंबित असल्याने या प्रकरणातील आरोपींना चौकशीसाठी मिळावे यासाठी इतर ठाण्यातील पोलीस न्यायालयात हजर होते.
जीएस ऑईल मिलमधलेही भंगार चोरी
जीएस ऑइल मिल भालर मार्गावर सुरू झाली होती. या मिलच्या संचालक मंडळाने कोट्यवधींचा घोळ केल्याने जीएस ऑइल मिल सुद्धा बंद पडली आहे. कारखाने बंद पडले की भंगार विक्रेत्यांना सुगीचे दिवस येतात. अख्या जीएस मिलला लागलेले लोखंड, टिनपत्रे भंगार चोरट्यानी लांबविले आहेत. संपूर्ण मिल सध्यातरी ओसाड दिसायला लागली आहे.