बहुगुणी डेस्क, वणी: वणीतील सुपरिचित पत्रकार रवि ढुमणे (55) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. रवि ढुमणे हे मुळचे चिखलगाव येथील रहिवासी होते. ते सध्या वणीतील नांदेपेरा बायपास रोडवरील विद्या नगरी चामाटे ले आऊट येथे कुटुबीयांसह राहत होते. सकाळी चहा देण्यासाठी कुटुंबीय त्यांच्या खोलीत गेले असता त्यांनी आतून दार उघडला नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी खोलीत जाऊन बघितले असता ही घटना उघडकीस आली. त्यांनी घराच्या खिडकीच्या गजाला दोर बांधून गळफास घेतला. सध्यातरी आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. मात्र काही कारणास्तव ते काही काळापासून नैराश्यात होते, असे त्यांचे परिचित सांगत आहेत.
त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलं, सुन असा मोठा आप्त परिवार आहे. आठ दिवसांआधीच त्यांच्या मुलाचे लग्न झाले आहे. एक धडाडीचा पत्रकार म्हणून त्यांची शहरात ओळख होती. क्राईम रिपोर्टिंगमध्ये त्यांचा विशेष हातखंडा होता. यासह ते राजकीय व सामाजिक क्षेत्रातही हिरारीने सहभागी असायचे. अनेक तरुणांना त्यांनी मार्गदर्शन करीत पत्रकारीता क्षेत्रात आणले. विविध प्रतिष्ठीत वृत्तपत्रात त्यांनी पत्रकार म्हणून काम केले. वणी बहुगुणीतही काही काळ त्यांनी बातमीदारी केली होती.
गेल्या काही काळापासून तब्येतीच्या कारणामुळे ते पत्रकारीतेपासून काहीसे अलिप्त राहत होते. त्यांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येची बातमी कळताच हळहळ व्यक्त होत आहे. तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्याबाबत सहवेदना व्यक्त होत आहे. त्यांचे पार्थिव उत्तरिय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. (रवि ढुमणे यांना वणी बहुगुणी टीमतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली..)


Comments are closed.