संत रविदास युवा मंचाद्वारा गुणवंतांचा सत्कार व मार्गदर्शन मेळावा
सुरेंद्र इखारे, वणीः येथील संत रविदास समाज सुधार मंडळ आणि संत रविदास युवा मंचाद्वारा गुणवंतांचा गौरव सोहळा व मार्गदर्शन मेळावा झाला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील कल्याण मंडपम येथे माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली, वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सोहळ्याचे उद्घाटन केले.
यावेळी स्वाभिमानी चर्मकार संघाचे अध्यक्ष रविकिरण घोलप, महाराष्ट्र चर्मकार परिषदेचे मुख्य संघटक ज्ञानेश्वर वरपे, वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, महाराष्ट्र चर्मकार परिषदेचे प्रदेशाध्यक्ष गोपाल चंदन, महाराष्ट्र चर्मकार परिषदेचे प्रदेशाध्यक्ष गोपाल चंदन, माजी कुलगुरू वेंकटेश्वरा विद्यापीठ, उत्तर प्रदेश, जे.जे.टी. विद्यापीठ, राजस्थानचे माजी कुलगुरू, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव प्रा.अर्जुन महादेव मुरुडकर, मुंबई उच्च न्यायालयाचे अॅड. नारायणराव गायकवाड, भीमशक्ती मंडळ नाशिकचे अध्यक्ष संजय पगारे, माळी समाज नाशिकचे अध्यक्ष बापूभाऊ महाजन, चर्मकार समाज सुधार मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ टिकले, संजय पिंपळशेंडे, पाणी पुरवठा विभाग,नगर परिषद, वणीचे माजी सभापती संबा वाघमारे यांसह अनेक दिग्गजांची उपस्थिती या सोहळ्याला होती.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून संबा वाघमारे यांनी आयोजनाची भूमिका मांडली. सर्व समाज एकत्र आला पाहिजे. विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक मार्गदर्शन मिळाले पाहिजे. समाज एक झाला पाहिजे. संवाद झाला पाहिजे तसेच समाजातील गुणीजनांचा गौरव झाला पाहिजे यासाठी हा सोहळा आयोजित केल्याचे वाघमारे बोलले.
उद्घाटनसत्रानंतर दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थी तसेच कला, क्रीडा, साहित्य तसेच विविध क्षेत्रांत यशस्वीतांचा गौरव करण्यात आला. युवा उद्योजक म्हणून अतुल संबा वाघमारे तसेच पत्रकार म्हणून आकाश डुबे यांचा विशेष सत्कार मान्यवरांनी केला.
ज्ञानेश्वर वरपे यांनी महामानवांच्या कार्यावर प्रकाष टाकला. या सर्व महामानवांचे कार्य प्रत्यक्ष कृतीत आले पाहिजे यावर त्यांनी भर दिला. संत रविदास, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला, जनतेला विश्वास दिला. आपण सर्वांनी आपल्या क्षमतांचा विकास केला पाहिजे असेही ते म्हणाले.
अॅड. नारायण गायकवाड यांनी उपस्थितांना कायदेषीर मार्गदर्शन केले. अॅट्रॉसिटी अॅक्टवर त्यांचे विशेष कार्य आहे. समाजबांधवांना या संबंधाने काही अडचण असल्यास मार्गदर्शन करणार असल्याचे ते म्हणाले. आपण एकता राखत कर्तव्याशी प्रामाणिक राहिलं पाहिजे. जागृत राहिलं पाहिजे. अनिष्ट बेड्या आपण तोडल्या पाहिजे असंही ते यावेळी म्हणाले.
रविकिरण घोलप यांनी समाजातील विविध समस्यांवर प्रकाश टाकला. शिक्षण या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर त्यांनी भर दिला. समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणसाठी यथायोग्य मार्गदर्शन व मदत करण्याचा विश्वासही त्यांनी दिला.
आपल्या उद्घाटनपर भाषणात आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचं म्हटलं. स्पर्धेच्या युगात अनेक आवाहने आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाच्या कक्षा वाढवाव्यात. विविध क्षेत्रांत प्रवेश करावा. संघर्ष आणि समस्यांना जिद्दीने तोंड दिलं पाहिजे. समाजातील शेवटच्या माणसाचा विचार सर्वांनीच केला पाहिज असं ते म्हणाले.
गोपाल चंदन यांनी समाज जागृती आणि संघटनप्रणाली या विषयावर भाष्य केलं. आपण समाजाचं देणं लागतो याचा प्रत्येकाने विचार करावा. ही परतफेड आपण केलीच पाहिजे. समाजाचं नेतृत्त्व करायला आपण शिकलं पाहिजे. आपण स्वतःसाठी तर जगतोच पण इतरांसाठीदेखील जगलं पाहिजे. सोबतच गोपाल चंदन यांनी विविध विषयांवर प्रकाश टाकला.
नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी पालकांचं अभिनंदन केलं. पालकांनी त्यांच्या पाल्यासाठी सर्व दिशा मोकळ्या करून द्याव्यात असंही आवाहन त्यांनी केलं. आई हा पहिला गुरू असतो. आईची महती यावेळी त्यांनी सांगितली. आई सर्वात विश्वासपात्र असते. तिचा सन्मान करा. आपण आपल्या कर्तृत्त्वाने मोठं होऊन मातृत्त्वाचा गौरव करावं करा असंही ते म्हणाले.
मुख्य मार्गदर्शक प्रा. अर्जुन मुरूडकर यांनी समाजिक, शैक्षणिक, आर्थिक, युवा व कायदेशीर मार्गदर्शन केले. सर्वसमावेशक व व्यापक असे त्यांनी मार्गदर्शन केले. आपल्या पाल्यांची मानसिक अभिरूची ओळखणं अत्यंत आवश्यक असल्याचं ते म्हणाले. विद्यार्थ्याचा, पाल्याचा कल कोणत्या बाजूने आहे. त्याची कोणत्याच विषयात विशेष आवड आहे. तसेच तो कोणत्या क्षेत्रात कुशल आहे याचा अभ्यास करूनच त्याला पुढील शिक्षण सुचवावे. ‘‘डाटा अॅनालिसीस’’ सारखे अनेक नवनवे अभ्यासक्रम आले आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक शैक्षणिक कक्षा आहेत. त्या सर्व व्यापक कक्षांचा उपयोग करावा असेही ते म्हणाले. शरीर, मन, मेंदू आणि चरित्र सर्वच समाजबांधवांनी स्वच्छ व शुद्ध ठेवावे. आपल्या जबाबदाऱ्या आणि आपली कर्तव्ये प्रामाणिकपणे पाळावीत. असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणातून विश्वास नांदेकर यांनी विविध विषयांचा आढावा घेतला. शिक्षणाचं महत्त्व त्यांनी यावेळी पटवून दिलं. जे प्रवाहापासून तुटले आहेत, त्यांना प्रवाहात आणणे आवश्यक आहे. त्यासाठी शिक्षण व प्रबोधन हाच एकमेव पर्याय असल्याचं ते म्हणाले. जातीपातीच्या भिंती आपण तोडल्या पाहिजे. जिद्द व चिकाटी ठेवून आपण आपली उन्नती केली पाहिजे. समाजातील सर्वच घटकांना उन्नत करण्यासाठी आपण झटलं पाहिजे. आपण आपसांतील दृढ व विश्वासाचे संबंध विकसित केले पाहिजे असे ते म्हणाले.
या सोहळ्याचे संचालन कवी, गीतकार व लेखक सुनील इंदुवामन ठाकरे यांनी केले. आभार दौलत वाघमारे यांनी मानले. या सोहळ्याच्या आयोजनाची व्यवस्था किशन कोरडे, चंदा गिरडकर, राणी आंडे, संजोता पिंपळकर, प्रतीक्षा पिंपळकर, रवी धुळे, आकाश डुबे, महेश लिपटे, संदीप वाघमारे, योगेश सोनोने, भारत लिपटे, अमोल बांगडे, किशोर हांडे, हेमंत वाघमारे, राकेश बडजापुरे, अमोल पिंपळकर, राहुल पिंपळकर, अमोल बांगडे, भारत लिपटे, मंगेश सोनोने यांनी सांभाळली.