सिमेंट कंपनीतील मजुरांचा अखेर संयम संपला, मजूर आक्रमक
खाण्यापिण्याची व आरोग्याबाबत गैरसोय होत असल्याची तक्रार
सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकूटबन येथील आरसीसीपीएल सिमेंट फॅक्टरीतील कामगारांच्या संयमाचा बांध अखेर फुटला. लॉकडाऊनमधल्या मजुरांची कंपनीतर्फे योग्य ती देखभाल केली जात नाही. कंपनीत सोयीसुवाधांचा अभाव असल्याने अखेर मजुरांनी आक्रमक धोरण अवलंबले. त्यामुळे फॅक्टरीत काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे मुकुटबन पोलीस ताफा घेऊन पोहचले. पण परिस्थिती गंभीर होऊ नये यासाठी उपविभागातील पोलिसांची जादा कुमकही मागवण्यात आली होती. आज मजूर, अधिकारी व पोलीस प्रशासनाची बैठक झाल्यानंतर पोलिसांनी कंपनीला कामगारांची देखभाल करण्याचे आदेश दिले.
मुकुटबन येथील आससीसीपीएल या फॅक्टरीमध्ये उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, झारखंड, यासह राज्यातील मजूरही काम करतात. तालुक्यातील 3 ते 4 हजार कामगार व अधिकारी येथे काम करीत आहे. लॉकडाऊन पूर्वी काही कामगार गेल्यामुळे सध्या सुमारे 2 हजार बाहेर राज्यातील कामगार मुकुटबन येथे अडकले आहे. 14 एप्रिल नंतर लॉकडाऊन उघडणार या आशेवर सर्व मजूर होते. परंतु कोरोनाचा वाढता प्रकोप पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविला. या निर्णयामुळे सदर कंपनीतील दोन हजार कामगार व कर्मचारी चिंता वाढली.
नातेवाईक, आई-वडील, मुलापासुन दूर राहणे, तसेच कुटुंबातील व्यक्तीच्या खाण्यापिण्याची, आरोग्याची योग्य ती देखभाल होत नाही. तसेच कंपनीतीत राहण्याची व जेवणाची योग्य ती व्यवस्था नाही, पगार मिळत नाही, इत्यादी कारणासह एकाच ठिकाणी राहून त्रस्त झालेल्या मजुरांच्या संयमाचा बांध अखेर फुटला. कंपनीत काम करत असलेल्या हजारो कामगारांनी 15 एप्रिल रोजी आक्रमक धोरण अवलंबले. अखेर मुकूटबन पोलीस स्टेशनला याची माहिती देण्यात आली.
मजूर आक्रमक झाल्याची माहिती मिळताच मुकुटबनचे ठाणेदार धर्मा सोनुने आपला पोलीस ताफा घेऊन पोहचले. काही वेळात पोलीस उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक व नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकर सुद्धा पोहचले. परिस्थिती गंभीर झाल्याने वणी, शिरपूर, पाटण व मारेगाव येथील ठाणेदार संपूर्ण पोलीस कार्मचारी त्यांचा ताफा पोहचला. मात्र मजूर ऐकण्याच्या पलिकडे गेले होते. त्यांना समजविण्याकरिता अधिकारी वर्गाला मोठी कसरत करावी लागली. अखेर 6 वाजेपर्यंत सर्व मजुरांच्या समस्या ऐकून घेतल्या.
आज 16 एप्रिल रोजी 11 वाजता उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी कंपनीतील अधिकारी व काही मजुरांना बोलावून मिटिंग घेतली. त्यात नायक यांनी मजुरांना जेवणाचे राहण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना केल्या. तसेच त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सॅनिटायझर व हॅन्ड वॉशची व्यवस्था करावी असा ही आदेश दिला. या आदेशाचे पालन न केल्यास कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सध्या घरी परत जाण्याकरीता ही वेळ योग्य नाही. प्रशासनानेही जिल्हा व राज्य बंदी केली आहे. मजुरांची आहे त्या ठिकाणीच व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे मजुरांच्या ज्या काही समस्या असेल त्या समस्या दूर करण्याचा प्रयत्न करेल. जेवणाची तसेच आरोग्याबाबतच्या समस्या सोडवण्यात येईल त्यामुळे प्रशासनाला सहकार्य करा असे आर्जव ठाणेदार धर्मा सोनुने यांनी केल्यावर मजुरांनी नमती भूमिका घेतली. यावेळी कंपनीचे सर्व अधिकारी व कामगार उपस्थित होते.