सुनील इंदुवामन ठाकरे, वणीः आषाढ-श्रावण म्हणजे रानमेव्यांची मेजवानी. बाजारात छोट्या छोट्या ढीगांमध्ये रानमेव्यांचं थाटात आगमन सुरू होतं. बाजारात बहुगुणी काटवलं आलेत. तसे पाहता श्रावणात काटवलं येतात. अलीकडच्या काळात ते आषाढातही मिळायला लागलेत. पूर्वी नैसर्गिकरीत्या मिळणारी ही काटवलं आता शेतीतून पिकवायला सुरुवात झाली. जुन्या-जाणत्या लोकांना याचे औषधी गुणधर्म माहिती असल्याने याचं आहारात फार महत्त्व आहे. हिरवे काटेरी छोटेसे फळ विदर्भात ‘काटवल’ म्हणून ओळखलं जातं.
विदर्भाबाहेर याला करटोली, कंटोली, रानकारली, कर्कोटकी, करटुली आणि इंग्रजीत याला वाईल्ड करेला फ्रूट म्हणतात. याला काटेरी टरफल असल्यामुळे ‘स्पाईनी गॉर्ड’ असंही म्हणतात. वनस्पतीशास्त्राचे प्रा. म. गो. खाडे यांनी याचं शास्त्रीय नाव ‘मोमार्डिका डायओयिका’ असल्याचं सांगितलं. काटवलं हे कुकरबिटेसी कुळात येतात. डोंगराळ भागातील वातावरण या फळभाजीला अत्यंत पोषक असतं. विदर्भ, कोकण, मराठवाडा, पश्चिम घाट व पश्चिम महाराष्ट्रात हे नैसर्गिकरीत्या मिळतात. याची शेतातदेखील लागवड केली जाते. काटवलं/करटोलीच्या वेलीला कंद असतात. यात ‘मेल’ व ‘फिमेल’ म्हणजेच नर व मादी वेल असते. जाणिवपूर्वक शेतीत लावण्याकरिता शेतकरी याच्या प्रमाणाबाबत दक्षता घेतात.
मादी काटवलाच्या वेलीचे कंद औषधी म्हणून वापरतात. डोकेदुखी, मधूमेह, मूळव्याध, ताप, दमा, बद्धकोष्ठ, मूतखडा, त्त्वचारोग अशा अनेक आजारांवर यातील विविध घटकांचा लाभ होतो असे तज्ज्ञ मानतात. वणी परिसरात काटवलं चौका-चौकात विकायला आलीत. सुमारे 20-30 रूपये ढीग असा भाव असतो. मुंबई, नागपूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये हे जवळपास 200 रूपये किलो असतात. पावसाळ्यााच्या आरंभी हे जाणीवपूर्वक विविध माध्यमांतून खाल्लेच पाहिजेत. यात अनेक औषधी गुणधर्म असतात. सामान्य मजूर, शेतकरी किंवा ग्रामीण लोक हे बाजारात विकायला आणतात. याचे मूल्य ठरवणे कठीण असते. मात्र त्यातही काही ‘बारीक’’ भावबाजी करतात. हा रानमेवा आहे. मोठ्या कष्टाने बाजारात विकायला आणणारे लोक हे सामान्यजनच असतात.
गावागावातून तरोटा आणि इतर रानमेवादेखील पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आहारात उपयोगात आणला जातो. निसर्गाचं हे देणं आहे. हा रानमेवा आहे. याचा आस्वाद घ्याच. वेगवेगळ्या पद्धतीने काटवलाच्या भाज्या करता येतात. हा निसर्गाचा अमूल्य ठेवा आहे. काटवलाचे गुण ओळखून, उपयुक्तता ओळखून या पावसाळ्यात अस्सल रानमेवा चाखायला पडाच घराबाहेर….
सुनील इंदुवामन ठाकरे