वणी तालुक्यात विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिन संपन्न
प्रमोद क्षिरसागर, वणी: भारताचा 69 वा वर्धापन दिन वणी तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला. वणी येथील शासकीय मैदानावर पार पडलेल्या मुख्य शासकीय कार्यक्रमात तहसीलदार रविंद्र जोगी यांनी ध्वजारोहन केले. नगर परिषद वणीच्या कार्यक्रमात नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी व विविध शासकीय कार्यालयात कार्यालय प्रमुखांनी ध्वजारोहन करून प्रजासत्ताक दिन साजरा केला.
येथील शासकीय मैदानावर झालेल्या कार्यक्रमात पोलीस, गृहरक्षक दल, विविध शाळांचे एन.सी.सी., एम.सी.सी.आर.एस.पी., स्काऊट गाईडचे पथक, अग्निशमन दल व रुग्णवाहिका पथ संचलनात सहभागी झाल्या होत्या. पथसंचलनानंतर वणी शहरातील सर्व शाळांनी मैदानी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. प्राथमिक,उच्च प्राथमिक व माध्यमिक अशा तीन गटामध्ये हा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला.
त्यात प्राथमिक गटातून विवेकानंद प्राथमिक विद्यालय, लायन्स स्कूल व नगर परिषद शाळा क्र.1 ने अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. उच्च प्राथमिक गटातून स्वर्णलीला इंटर नॅशनल स्कूल, नगर परिषद शाळा क्र.7 व नगर परिषद शाळा क्र.5 ने अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. माध्यमिक विभागातून आदर्श विद्यालय वणी, जनता विद्यालय वणी व विवेकानंद विद्यालय वणी या शाळांनी अनुक्रमे प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला.
या प्रसंगी झालेल्या उत्कृष्ठ पथसंचलन करणाऱ्या लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या एन.सी.सी. पथकाने प्रथम, विवेकानंद विद्यालयाच्या आर.एस.पी.च्या पथकाने द्वितीय व लायन्स स्कूलच्या एन सी सी.पथकाने तृतीय क्रमांक पटकाविला. या स्पर्धेचे परीक्षण अशोक सोनटक्के व गणपत अतकारे यांनी केले. या स्पर्धेतील विजेत्यांना जेसीआइ क्लब वणी सिटी तर्फे बक्षिसे प्रायोजित करण्यात आले होते.