वाहून गेलेल्या तिघांचेही मृतदेह आढळले, हर्षलवर आज अंत्यसंस्कार

तिघांच्या मृत्यूने विठ्ठलवाडी हादरली, सोबतच्या मित्रांना मानसिक धक्का

विवेक तोटेवार, वणी: महाशिवरात्रीनिमित्त सुटी असल्याने सहलीसाठी गेलेले विठ्ठलवाडी येथील तीन तरुण पाटाळ्याजवळ नदीत वाहून गेले होते. यातील संकेत पुंडलीक नगराळे (27), अनिरुद्ध सतिश चाफले (22) या दोघांचा मृतदेह शनिवारी दुपारी आढळला तर हर्षल आतिश चाफले (16) या तरुणाचा मृतदेह आज रविवारी पहाटेच्या सुमारास आढळला.  दरम्यान शनिवारी शोकाकुल वातावरणात संकेत व अनिरुद्धवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शुक्रवारी दिनांक 8 मार्च रोजी सुटी असल्याने 10 ते 11 मित्रांचा गृप वरोरा तालुक्यातील भटाळी येथे यात्रेसाठी गेला होता. दुपारी 5 वाजताच्या सुमारास यात्रेहून परतताना पाटाळ्याजवळ वर्धा नदीत यांचा आंघोळ करण्याचा मोह झाला. त्यामुळे हे सर्व वर्धा नदीपात्रात पोहण्यासाठी उतरले होते. दरम्यान पाण्याचा अंदाज न आल्याने हर्षल डोहात बुडत होता. भावाला वाचवण्यासाठी अनिरुद्ध हा मदतीला धावला. मात्र तो ही बुडाला. त्यामुळे संकेत वाचवण्यासाठी गेला. मात्र हे तिघेही पाण्यात वाहून गेले. 

सकाळी रेस्क्यू टीम दाखल
शनिवारी सकाळी चंद्रपूर येथून रेस्क्यू टीम बोलवण्यात आली होती.या टीमने बोटीच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. मात्र दुपारी पावने 12 वाजताच्या सुमारास एकाचा मृतदेह घटनास्थळावर आढळला. तर दुस-याचा मृतदेह घटनास्थळावरून 100 मिटर पुढे आढळला. मात्र संध्याकाळ पर्यंत तिसरा मृतदेह हाती आला नव्हता. रविवारी पहाटेच्या सुमारास मृतदेह तरंगत असल्याचे आढळले. त्यामुळे हर्षलच्या मृतदेहाचाही शोध लागला.

तिघांच्या मृत्यूने विठ्ठलवाडी हादरली
एकाच परिसरातील तीन मुले वाहून गेल्याने विठ्ठलवाडीत शोककळा पसरली आहे. अनिरुद्ध हा फोटोग्राफीचे प्रशिक्षण घेत होता. तर संकेतने नुकतेच वरोरा रोडवर चहा विक्रीचे दुकान टाकले होते. तर संकेतचा मोठा भाऊ नुकताच पोलीस विभागात नोकरीला लागला होता. घटनेच्या दिवशी तो नागपूर येथे रुजू होण्यास गेला होता. मात्र नागपूरला पोहोचताच त्याला त्याचा भाऊ वाहून गेल्याची बातमी कळली. दोन्ही भावावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्याचा त्यांच्या कुटुंबीयांचा विचार होता. मात्र हर्षलचा मृतदेह न सापडल्याने शनिवारी संकेत व अनिरुद्धवर अंत्यसंस्कार करण्यात आले तर आज हर्षलवर अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

मित्रांना मानसिक धक्का
डोळ्यादेखत तिन्ही मित्र वाहून गेले. त्यांना वाचवण्यात अपयश आल्याने त्यांच्या सोबत असलेले सर्व मित्रांना मानसिक धक्का बसला आहे. तर चाफले कुटुंबीयांवर सलग दोन दिवस तरुण मुलाचे अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्याने चाफले कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  

 

Comments are closed.