जितेंद्र कोठारी, वणी: ग्रामीण रुग्णालय वणी येथे सन २०१५ मध्ये मनसेने पाठपुरावा केल्याने सिझरची सुविधा सुरु झाली. त्यामुळे अनेक गोरगरीब जनतेला याचा फायदाही होऊ लागला. मात्र अलीकडे ही व्यवस्था बंद पडली आहे. ही सेवा सुरू करण्यासाठी मनसेने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले.
हे सुविधा बंद पडण्यामागे वैद्यकीय अधिकारी व काही खाजगी डॉक्टर्स याला कारणीभूत असल्याचा आरोपही मनसेने निवेदनातून केला. वणी ग्रामीण रुग्णालयात मोफत किंवा अत्यल्प दरात सिझर होत होते. त्यामुळे खाजगी रुग्णालयाकडे लोकांची धाव कमी झाली. याच कारणाने खासगी डॉक्टरांचे नुकसान मोठ्या प्रमाणात होऊ लागले.
खासगी दवाखान्यात सिझर करायला गेल्यास ४० ते ५० हजार रुपये खर्च लागतो. हा खर्च गोरगरीब जनतेला न परवडणारा आहे. या संदर्भात अनेक तक्रारी मनसेकडे आल्याचं निवेदनात म्हटलंय. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर प्रसुतीसाठी वेळ फार कमी आहे असे भय दाखवितात. असाही आरोप मनसेने केला आहे.
ग्रामीण रुग्णालय येथील डॉ. प्रेमानंद आवारी हे स्त्रिरोग तज्ज्ञ आहेत. यापूर्वी सुद्धा त्यांनी ग्रामीण रुग्णालय येथे अनेक सिझर केलेत. मात्र रुग्णालयात भूलतज्ज्ञ नसल्याने सिजर केले जात नाही. ग्रामीण रुग्णालयात लवकरात लवकर सिझरची सुविधा पुन्हा सुरु करण्यात यावी, अन्यथा मोठे आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर धनंजय त्रिंबके यांची स्वाक्षरी आहे.