विवेक तोटेवार, वणी: कोलगाव (पैनगंगा) चिंचोली, परमडोह येथे मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैधरित्या उपसा सुरु आहे. घरकुलासाठी जी रेती दिली जाते ती बांधकामासाठी योग्य नाही. याबाबत संबंधीतांना विचारणा केली असता त्यांच्याकडून खराब रेती मिळत असल्याचे उत्तर मिळत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी रेतीची अवैधरित्या होणारी वाहतूक बंद करावी, नागरिकांना चांगल्या प्रतिची रेती उपलब्ध करावी, नदी पात्रातील रेती उपशाचे मोजमाप करावे इत्यादी मागणीचे निवेदन शिंदोलावासीयांनी तहसीलदारांना दिले आहे. निवेदनावर गावातील 85 जणांच्या सह्या आहेत. दरम्यान ‘वणी बहुगुणी’ने रेती उत्खननाबाबत तहसीलदार यांना विचारणा केली असता त्यांनी रेतीघाटावर कुठलाही गैरप्रकार आढळला नसल्याची माहिती दिली.
ऑनलाईन रेती निकृष्ट तर ऑफलाईन उत्कृष्ट?
रेती चोरीमुळे शासनाने ऑनलाईन रेती विक्रीर पद्धती सुरु केली. सध्या ऑनलाईन व ऑफलाईन (अवैधरित्या) अशा दोन पद्धतीने रेती विक्रीस आहे. ऑनलाईन पद्धतीने 600 रुपये ब्रास असा दर शासनातर्फे निश्चित केला गेला आहे. मात्र यावर वाहतुकीचा अव्वाच्या सव्वा दर आकारला जात आहे. तर ऑफलाईन पद्धतीने (अवैधरित्या) दर हा तिप्पट ते चौप्पट आहे. मात्र यात रेतीचा दर्जा चांगला असतो. असा आरोप सर्वसामान्य ग्राहक करीत आहे. अनेक लोक बांधकाम निकृष्ट दर्जाचे होऊ नये म्हणून अव्वाच्या सव्वा दर देऊन महागडी रेती खरेदी करीत आहे.
डेपो धारकांना रेतीची साठवणूक, वाहतूक इत्यादी साठी शासनाने काही अटी व शर्ती दिल्या आहेत. मात्र या अटी व शर्तीचे राजरोसपणे उल्लंघन होत असल्याचा आरोप होत आहे. घरकुल धारकांना रेतीची गरज आहे. मात्र त्यांना निकृष्ट दर्जाची रेती मिळत असल्याने त्यांना चांगलाच आर्थिक भुर्दंड बसत आहे. या सर्व प्रकाराकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी सर्वसामान्य करीत आहे.
तालुक्यात रेतीचे अवैधरित्या उत्खनन नाही
रेती घाटावर अवैधरित्या रेती उत्खनन सुरु आहे. घरकुलाला रेती मिळत नाही. शिवाय बनावट आधार कार्ड बनवून रेती विकली जात असल्याचे जे आरोप आहेत, ते तथ्यहिन आहे. घाटाला भेट दिली असता तिथे पोकलँड आढळले नाही. तसेच घाटावर रेतीचे नियमांना धरूनच उत्खनन झाल्याचे आढळून आले. मध्यंतरी निवडणूक असल्याने रेती चोरीकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही. परंतु रेती तस्कर रडारवर असून काही गैरप्रकार आढळून आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.
– निखिल धुळधर, तहसीलदार, वणी
Comments are closed.