विवेक तोटेवार, वणी: नांदेपेरा रोडवर रेती अवैधरित्या वाहतूक करणा-या एका ट्रकवर महसूल विभागाने कारवाई केली. बुधवारी स. 10 वाजताच्या सुमारास सापळा रचून रेतीची तस्करी करणारा हायवा ट्रक जप्त करण्यात आला. सदर ट्रक हा चंद्रपूर येथील असल्याचे चौकशीत समोर आले आहे. या कारवाईमुळे बाहेर जिल्ह्यातील रेती तस्करांचा वणी परिसरात शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
तहसीलदार निखिल धुळधर यांना नांदेपेरा मार्गावरून रेतीची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची टीप मिळाली. त्यावरून त्यांनी नांदेपेरा रोडवरील अयोध्या नगरजवळ मंडळ अधिकारी, महसूलचे कर्मचारी व पोलिसांना सोबत घेऊन स. 9 वाजेपासून सापळा रचला. स. 10 वाजताच्या सुमारास या मार्गावरून एक ट्रक (MH 36 AA 1184) रेती घेऊन येताना या पथकाला आढळला. त्यांनी चालकाला ट्रक थांबवायला लावून त्याची चौकशी केली. चालकाला वाहतुकीच्या परवान्याचे कागदपत्रे मागितले असता त्याच्याकडे वाहतुकीचा परवाना (रॉयल्टी) नव्हता.
पथकाने ट्रक जप्त करीत चालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याने त्याचे नाव अजय आनंदराव कुमरे असे सांगितले. त्याच्यासोबत असलेल्या वाहकाचे नाव ज्ञानेश्वर बोधले आहे. सदर ट्रक कुणाच्या मालकीचा असल्याची विचारणा केली असता सदर ट्रक चंद्रपूर येथील योगेश अरुण मनगटे याचा असल्याची माहिती चालकाने दिली. तसेच मालकाच्या सांगण्यावरून रेतीची वाहतूक होत असल्याची माहिती त्याने दिली.
परजिल्ह्यातील तस्करांची एन्ट्री
गेल्या काही दिवसांपासून रेती तस्करीला उधाण आले आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत असल्याचे रेती तस्करांचा चांगलाच उन्माद सुरु आहे. आधीच तालुक्यात रेती माफिया चांगलेच फोफावले असताना आता परजिल्ह्यातील रेती तस्करांचा शिरकाव वणी परिसरात झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून परजिल्ह्यातील तस्कर रेतीची अवैधरित्या वाहतूक करीत असल्याचे समोर आले आहे.
रेतीची अवैधरित्या वाहतूक होत असल्याचे स्पष्ट झाल्याने सदर ट्रक जप्त करण्यात आला. सदर कारवाई उपविभागीय अधिकारी डॉ नितीनकुमार हिंगोले व तहसीलदार निखिल धूळधर यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकर, नायब तहसीलदार अशोक ब्राम्हणवाडे, ग्राम महसूल अधिकारी वांजरी नमो आनंदराव शेंडे, ग्राम महसूल अधिकारी गणेश सुमेध अधम, जमादार प्रशांत गोहणे, शिपाई गणेश राजुरकर यांनी केली.
Comments are closed.