जितेंद्र कोठारी, वणी: राज्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, शहरी व ग्रामीण रस्त्यांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून आर्थिक वर्ष 2019-20 साठी मंजूर हजारो कोटीचे बांधकाम प्रगती पथावर असतांना कोरोना महामारी व लॉकडाउनमुळे राज्यातील सर्व बांधकाम “जैसे थे” स्थितीत थांबविण्यात आले. त्यामुळे रस्ते बांधकामासाठी इतर राज्यातून आलेले मजूरसुद्दा परत आपल्या गावी गेले.
वणी उपविभागात वणी, मारेगाव व झरी तालुक्यातसुद्दा सार्वजनिक बांधकाम विभाग, जि. प. बांधकाम विभाग, नगर परिषद, नगर पंचायत, कृषी विभाग, वन विभागतर्फे मंजूर अनेक कामे सुरु होते. मुख्यतः केंद्रीय सडक निधी (CRF) अंतर्गत वणी, कायर ते पुरड (4700 लक्ष) व बोरी, पाटण ते मुकुटबन (7200 लक्ष) हे दोन मोठे व महत्वाचे रस्ते बांधकाम काम सुरू होते. वणी कायर ते पुरड या कामावर अनेक ठिकाणी नाल्यांवर सिमेंट पूल बांधण्याचे कामे सुरू असून संबंधित ठेकेदारांनी तयार केलेले तात्पुरते मार्ग (डायव्हर्सन) वरून वाहतूक सुरू आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 18 मार्च पासून संचारबंदी लागू करण्यात आली असता सर्व रस्त्याचे कामेसुद्दा बंद करण्यात आले होते. येत्या काही दिवसात पाऊसकाळ लागणार असून अर्धवट कामामुळे वणी मुकूटबन मार्गावर वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावर अत्यावश्यक असलेले कार्य सोशल डीस्टेंसिंग व कोरोना संबंधित इतर सुरक्षा उपाय योजना राबवून पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
राज्यातील काही जिल्ह्यात महत्वाच्या रस्ते बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग यवतमाळचे अधीक्षक अभियंता यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ याना पत्र पाठवून जिल्ह्यातील महत्वाचे रस्ते पावसाळ्यापूर्वी बांधकाम करीता परवानगी देण्याची मागणी केली आहे.