कोरपना ते वणी मार्गाचे चौपदरीकरण करावे, आमदारांना निवेदन

राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याची आशिष ताजणे यांची मागणी

तालुका प्रतिनिधी, वणी: चंद्रपूर – यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या कोरपना ते वणी मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन चौपदरीकरण करण्यात यावे. या मागणीसाठी राज्याचे माजी अर्थमंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकूरवार यांच्याकडे केली आहे. तसेच त्यांनी सदर मागणी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करून सदर राष्ट्रीय महामार्ग मंजूर करावा, अशी मागणी केलेली आहे. सदर मागणीचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार बोदकूरवार यांनी आशिष ताजने यांना दिले आहे.

कोरपना ते वणी हा 42 किलोमीटरचा मार्ग आहे. यातील वणी ते चारगाव चौकी पर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण झाले आहे. परंतु चारगाव चौकी ते कोरपना हा 32 किलोमीटरच्या रस्त्याची अत्यंत दैनावस्था झाली आहे. त्यामुळे वाहतूकदार व नागरिकांना तारेवरची कसरत करत प्रवास करावा लागतो.

अलीकडेच वरोरा ते वणी राज्य महामार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आले. हा महामार्ग कोरपना पर्यंत थेट जोडणारा आहे. त्यामुळे या मार्गाला सुद्धा राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन चौपदरीकरण करण्याची मागणी आहे.

सदर महामार्ग झाल्यास कोरपना व वणी परिसरातील सिमेंट, कोळसा, जिनिंग प्रेसिंग, गिटी खदानच्या जड वाहतुकीसाठी व दोन्ही जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनी प्रवास करण्यासाठी सोयीचा होईल. शिवाय कोरपना पासून नागपूर पर्यंतच्या प्रवासासाठी ही हा मार्ग सोयीस्कर होईल.

सदर मार्गाने प्रवास करताना प्रवाशांचे प्रचंड हाल होतात. रस्त्याच्या लगतच्या शेतातील पिकांना धुळीचा फटका बसून शेतमालांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. तसेच कोरपना ते वणी मार्गावरील दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत.

हे देखील वाचा:

केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनला जागा देण्यास आक्षेप नाही- आ. बोदकुरवार

मुस्लिम समाजाला शासकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण द्या

Comments are closed.