गणेशपूरचे झाले ‘चिखल’गाव, खड्ड्यातून काढावी लागते वाट…
ग्रामपंचायत समोरच खड्डे, गावातील नागरिकांची 'पंचायत'...
विवेक तोटेवार, वणी: शहराला लागून असलेला गणेशपूर ग्रामपंचायत हद्दीत सध्या चिखल व खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे. गणेशपूरहून मोठ्या प्रमाणात गावकरी वणीला येतात. मात्र त्यासाठी त्यांना चिखलातून वाट काढावी लागत आहे. गेल्या दोन ते तीन वर्षापासून गणेशपूर येथे हिच परिस्थिती आहे. त्यामुळे गणेशपूरचे ‘चिखल’गाव झाले म्हणण्याची वेळ गावक-यांवर आली आहे. ग्रामपंचायतीने खड्डे बुजवावे अशी मागणी गावकरी करीत आहे.
वणी येथे जागेची समस्या असल्याने तसेच जागेचे दर वाढल्याने एक निसर्गरम्य परिसर म्हणून गणेशपूर डेव्हलप होण्यास सुरुवात झाली. या गावात छोरिया ले आऊट सारख्या अनेक वसाहती येथे बनल्या. तसेच अनेक नवीन लेआऊट येथे तयार होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणात टॅक्स मिळत आहे. मात्र सोयीसुविधा देण्यास ग्रामपंचायत कमी पडत असल्याचा आरोप होत आहे. वणी ते गणेशपूर या गावाला निर्गुडा नदी वेगळी करतो. या मार्गावरून ये-जा करण्यासाठी तसेच मुकुटबन रोडवर जाण्यासाठी सोयीस्कर मार्ग म्हणून निर्गुडा नदीवर पूल बांधण्यात आला. त्यामुळे मुकुटबन मार्गावर जाण्यासाठीचा फेरा वाचला.
या सर्व नागरिकांना गणेशपूरला जायचं असल्यास हा एकच पूल आहे. या पुलाच्या समोरच एक मोठा खड्डा पडला आहे. ज्यामुळे नागरिकांना चिखलातून वाट काढावी लागते. शिवाय अनेकदा लहान मोठे अपघात या ठिकाणी होतात. महत्वाचे म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयापासून ही अगदी हाकेच्या अंतरावर आहे. या रस्त्यावरून स्कूल बस, ऑटो, दुचाकी व चारचाकी वाहनांची रेलचेल असते. थातूरमातूर दुरुस्ती करून ग्रामपंचायत स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. या रस्त्याकडे पाहून आता नागरिकांचा रोष वाढत चालला आहे.


Comments are closed.