बेपत्ता ईसमाचा नग्नावस्थेत आढळला मृतदेह, एकच खळबळ

शरीरावर जखमा, खून असल्याचा प्राथमिक अंदाज

बहुगुणी डेस्क, वणी: वणी-घुग्घुस रोडवरील एका बारसमोर मंदर शिवारात एका इसमाचा नग्नावस्थेत मृतदेह आढळला. मृतदेहाच्या शरीराव जखमा असल्याने हा खून असल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे. सदर इसमाची ओळख पटली असून त्याचे नाव देवराव गुंजेकर (वय अंदाजे 50) असल्याचे समोर आले आहे. ते तीन ते चार दिवसांपासून बेपत्ता होते. त्यानंतर आज सोमवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेहच आढळला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मृत देवराव हे लालगुडा (नवीन) येथील रहिवासी होते. दोन महिन्यांपूर्वीच ते येथे राहण्यास आले होते. ते तिथे त्यांच्या एका नातेवाईकासह राहत होते अशी माहिती आहे. ते भंगार गोळा करण्याचे काम करायचे. ते तीन चार दिवसांआधी ते बेपत्ता झाले होते. आज सोमवारी दिनांक 18 ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजताच्या सुमारास परिसरातील काही लोक घुग्घुस रोडवर मॉर्निग वॉकला गेले होते. दरम्यान त्या लोकांना मांडवकर यांच्या बारसमोर मंदर शिवारात मृतदेह आढळला. त्यांनी याची माहिती वणी पोलिसांना दिली. वणी पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. दरम्यान वागदरा येथील लोक देखील घटनास्थळी दाखल झाले.

गावातील लोकांनी सदर मृतदेह कुणाचा असल्याचे ओळखले. याची माहिती तातडीने मृताच्या नातेवाईकांना देण्यात आली. पोलिसांना सदर मृतदेह नग्नावस्थेत आढळला. तसेच मृतदेहावर जखमा होत्या. तसेच देवराव यांचे कपडे मृतदेहाच्या शेजारी आढळले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला व मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवला. चेह-यावर जखमा असल्याने हा खून असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच दगडाने प्रहार केल्याचाही अंदाज व्यक्त होत आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. 

Comments are closed.