सराफा व्यापा-याला लुटणा-या दरोडेखोरांना उत्तर प्रदेश येथून अटक

जितेंद्र कोठारी, वणी: वडिलोपार्जित हिरे-मोत्यांचे दागिने विकत घेतो असे सांगून वणी येथील एका सराफा व्यावसायिकाचे लाखों रुपयांचे दागिने लुटणा-या दोन आरोपींना वणी पोलिसांनी उत्तरप्रदेश येथून अटक केली आहे. अरशद हुसेन उर्फ बबलू उर्फ ऐसउददीन (43) व तौसीर अहेमद उर्फ पप्पु वसीम अहेमद (37) रा. उत्तरप्रदेश असे अटक करण्यात आलेले आरोपींचे नावं आहेत. सहा. पोलीस निरीक्षक माधव शिंदे यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने प्रतापगढ (उ.प्र.) येथे जाऊन एका लग्न समारंभातून आरोपींना अटक केली. आरोपी सराफा व्यापाराला लुटून पैशाच्या ब्रिफकेसमध्ये मीठाची गोणी ठेवून पसार झाला होता. त्यामुळे हे प्रकरण चांगलेच गाजले होते.

काय आहे हे प्रकरण?
विनोद तुलसीराम खेरा (62) रा. गांधी चौक वणी येथील रहिवासी आहे. त्यांची शहरात सोन्या चांदीचे व्यावसायिक म्हणून ओळख आहे. यांच्या परिचयाचे शहरातील एक डॉक्टर कुटुंब आहे. या डॉक्टर कुटुंबाच्या कारवर आबिद रा. नागपूर नावाचा ड्रायव्हर होता. परिचयामुळे या दोन कुटुंबाचे एकमेकांच्या घरी येणे जाणे सुरू असायचे. काही महिन्याआधी एक दिवस खेरा यांनी वाहन चालकला त्यांच्याजवळ काही दागिने असून ते चांगल्या किमतीत विकायचे आहे, असे सांगत कुणी ग्राहक असल्यास कळवण्याची विनंती केली.

वाहन चालक आबिद याने विनोद खेरा यांची ओळख नागपूर येथील नुरेन नामक एका इसमासोबत करून दिली. नुरेनने खेरा यांची ओळख एसोद्दीन नामक एका इसमासोबत करून दिली. एसोद्दीनने दागिने खरेदी करण्यासाठी एक पार्टी मिळाली असल्याची बतावणी खेरा यांच्याजवळ केली. मात्र सौदा पक्का करण्याआधी एसोद्दीन याने खेरा यांना दागिने पाहण्याची अट टाकली. दागिने पाहिल्यावरच त्याची किंमत ठरेल असे ही त्याने खेरा यांना सांगितले. त्यानंतर एसोद्दीन हा तब्बल 10 वेळ वणीत दागिने पाहण्यासाठी आला. मात्र खेरा यांनी त्याला दागिने दाखवण्यास टाळाटाळ केली. सौदा पक्का होईल तेव्हाच दागिने दाखवण्याची अट टाकली. काही दिवसांनंतर या दोघांमध्ये दागिने पाहून लगेच पैसे देण्याचा सौदा पक्का झाला होता.

16 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास एसोद्दीन हा त्याच्या दोन साथीदारांना घेऊन वणीला आला. ते तिघे खेरा यांना भेटायला त्यांच्या सोन्याचांदीच्या दुकानात गेले. तिथे त्यांच्यात दागिने पाहिल्यावर लगेच पैसे देण्याचे ठरले. तसेच रात्री घरी भेटण्याचे निश्चित झाले. रात्री 9 वाजता एसोद्दीन खेरा यांच्या गांधी चौकातील घरी गेला. घरी पोहोचल्यावर विनोद खेरा यांनी एसोद्दीनला दागिने दाखविले. आरोपीने दागिने रुमालामध्ये गुंडाळून खिशात ठेवले. त्यानंतर एसोद्दीनचे दोन साथीदार एक लाल रंगाची मोठी बॅग घेऊन घरात आले. त्या बॅगमध्ये पैसे आहे सांगत त्यांनी ती बॅग घराच्या आतील रुम मध्ये ठेवली. त्या बॅगला छोटे कुलूप लावलेले होते. बॅगच्या कुलूपची चावी गाडीत राहिली अशी बतावणी करत ते चावी आणण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर पडले व तिथून पसार झाले. ते तिघेही पसार झाल्याचे लक्षात येताच खेरा यांनी बॅग उघडली. मात्र बॅगमध्ये त्यांना मिठाची गोणी ठेवलेली आढळली.

एसोद्दीनला दिलेल्या दागिन्यामध्ये मोत्यांनी जडलेल्या 4 सोन्याच्या बांगड्या, 1 डायमंड पत्ती हार, खऱ्या मोत्याचा हार (5 लडीचा), गळ्यातील मोत्याची माळ 1, हिरा व माणिक जडलेली अंगठी 1, नाकातली नथ (मुखडा असलेली) 1 असे अंदाजे 10 लाख रुपयांचे वडिलोपार्जित दागिने होते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खेरा यांनी त्याच रात्री 11.45 वाजता 100 नंबर वर कॉल केला. कॉल वरून तात्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पूज्जलवार व ठाणेदार रामकृष्ण महल्ले व पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनतर फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली. 

अशी झाली आरोपींना अटक…
पोलिस तपासात आरोपी हे मुळ उत्तर प्रदेश येथील प्रतापगढ जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपीच्या शोधात अनेकदा पोलीस पथक उत्तरप्रदेश येथे त्यांचे पत्त्यावर पाठविण्यात आले. परंतु आरोपी अतिशय सतर्क असल्याने पोलीसांना सतत हुलकावणी देत होते. दिनांक 10 जून रोजी वणी पोलीसांना गोपनीय माहिती मिळाली की गुन्हयातील आरोपीच्या नात्यातील एक लग्न प्रतापगढ़ (उ. प्र.) येथे आहे. या लग्नात आरोपी हजेरी लावु शकते अशी खात्रीशीर माहिती असल्याने वरीष्ठांची परवानगी घेऊन सपोनि माधव शिंदे, पोहेका. योगेश डगवार स्था.गु.शा, पो. ना. शेख इकबाल, सचिन मरकाम, हरीन्द्रकुमार भारती हे उत्तरप्रदेश येथे पोहचले. पथकाने आरोपीचा शोध घेवुन त्यास शिताफीने ताब्यात घेतले. तसेच आरोपीतांनी गुन्हयात वापरलेले स्कॉर्पिओ गाडी सुध्दा ताब्यात घेतली.

सदरची कार्यवाही .डॉ. पवन बंसोड पोलीस अधीक्षक यवतमाळ, पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ, गणेश किंद्रे एसडीपीओ वणी, यांच्या मार्गदर्शनात पो.नि. प्रदिप शिरस्कर ठाणेदार पोलीस स्टेशन वणी, सहायक पोलीस निरीक्षक माधव शिद, पोहेकॉ / योगेश डगवार स्था.गु.शा, पोना/ शेख इकबाल, उपविभागीय कार्यालय वणी, पोना/सचिन मरकाम, पीना/हरीन्द्रकुमार भारती यांनी केली. पुढील तपास सपोनि / माधव शिंदे हे करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.