सिनेस्टाईल पाठलाग करून दरोडेखोरांच्या आवळल्या मुसक्या

एलसीबीची थरारक कारवाई, रोड रॉबरीतील 3 फरार आरोपी गजाआड

विवेक तोटेवार, वणी: प्रवासी घेऊन जाणा-या वाहन चालकाला अडवून बेदम लुटणा-या तीन दरोडेखोरांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. 7 जून रोजी मारेगाव-करंजी मार्गावरील घोगुलदरा फाट्यावर ही घटना घडली होती. दरोडेखोरांनी शस्त्राच्या धाकावर धमकावून वाहन चालकाकडून रक्कम पळवली होती. या प्रकरणातील फरार असलेल्या तीन आरोपींना एलसीबीच्या वणी येथील पथकाने नागपूर येथील मुसक्या आवळल्या. या ठिकाणी सिनेस्टाईल पाठलाग करीत पोलिसांनी ही कारवाई केली. शुभम सुधाकर कापसे (वय ३०) रा. जामनकरनगर, यवतमाळ, विकास दिनेश कुडे (३१), रा. सूरजनगर यवतमाळ, प्रफुल नारायणराव चौकडे (३६) रा. आठवडी बाजार, यवतमाळ अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

करंजी येथील रहिवासी सलीम सुलतान गिलाणी हा ७ जून रोजी प्रवासी घेऊन जात असताना घोगुलदरा फाट्यावर आरोपींनी त्याला अडवून मारहाण करून पोटाला चाकू लावत त्याच्याजवळील २० हजार ९०० रुपये हिसकावले होते. या प्रकरणी मारेगाव पोलिस ठाण्यात भा.दं. वि. ३९५, ३६४ अ, ३४२, ३२६, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात दोन आरोपींना आधीच अटक करण्यात आली होती, तर तिघेजण फरार होते.

Birthday ad 1

हे आरोपी नागपूर येथून परराज्यात पळून जाणार असल्याची टिप एलसीबीचे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांना मिळाली. त्यांनी एलसीबीचे पथकप्रमुख एपीआय अमोल मुडे व त्यांच्या पथकाला तातडीने नागपूरकडे रवाना होण्याचे आदेश दिले. नागपूरला पोहोचल्यानंतर रेल्वेस्थानक परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी आरोपींचा शोध घेण्यात आला. या दरम्यान, पोलीस आल्याची चाहून लागताच आरोपींनी तेथून पळ काढला. मात्र एलसीबीच्या पथकाने पाठलाग करून या तिघांच्याही मुसक्या आवळल्या

बुकिंगसाठी पोस्टरवर क्लिक करा...

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक पवन बन्सोड, अप्पर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक अमोल मुडे, पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर कांडुरे, पोलिस अंमलदार उल्हास कुरकुटे, नरेश राऊत, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, नीलेश निमकर, सुधीर पिदुरकर, सतीश फुके यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

Comments are closed.