विवेक तोटेवार, वणी: नदी जवळ असलेल्या गंगा विहार जवळ दरोडेखोरांनी शहरातील एका व्यावसायिकाला शस्त्राचा धाक दाखवून लुटले. सोमवारी दिनांक 19 ऑगस्ट रोजी रात्री सव्वा नऊ च्या सुमारास ही घटना घडली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसानी रात्री नाकाबंदी केली. दरम्यान नाकाबंदी असल्याने दरोडेखोर वरो-याजवळ बॅकीकेट्स तोडून पळाल्याची चर्चा शहरात चांगलीच रंगत आहे. रात्रीपासून युद्धपातळीवर दरोडेखोरांचा शोध सुरु आहे. बातमी लिहेपर्यंत दरोडेखोर पोलिसांच्या हाती आले नव्हते.
मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश बोढे हे निर्गुडा नदीजवळ असलेल्या गंगा विहार येथील रहिवासी आहे. त्यांचे जटाशंकर चौकातील ठाकूरवार कॉम्प्लेक्स येथे अंकुश मोबाईल शॉपी नावाने व्यवसाय आहे. रोज रात्री दुकान बंद केल्यानंतर अंकुश हे गल्ल्यातील सर्व रक्कम बॅगमध्ये टाकून दुचाकीने घरी जातात.
सोमवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास अंकुश हे नेहमीप्रमाणे घरी जात होते. दरम्यान घराजवळ गंगा विहार कॉम्प्लेक्सच्या गेटजवळ एका कारने अंकुश यांची दुचाकी थांबवली. या कारमध्ये 4 तरुण मुले होती. त्यातील तिघांनी त्यांनी अंकुश यांना चाकू दाखवून पैशाची बॅग हिसकावली. तसेच सोन्याची चैन व ब्रासलेट घेऊन ते पसार झाले.
आरोपींची अनेक दिवसांपासून रेकी?
गंगा विहार हा परिसर नदीच्या अगदी लगत आहे. गोरक्षण नंतर हा परिसर निर्जन असतो. आरोपींनी नेमकी हीच बाब ओळखली व दरोडा टाकण्याचे ठिकाण हे नदीजवळील निर्जन परिसर निवडले. आरोपींना व्यावसायिकाबाबत पूर्ण माहिती असून, आधीपासून रेकी करून व प्लानिंग करून हा दरोडा टाकण्यात आल्याचा अंदाज बांधला जात आहे.
घटना घडताच पोलिसांना तातडीने याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून वायरलेसने सर्व ठिकाणी याची माहिती देऊन जागोजागी नाकाबंदी केली. शहरात रात्रीच ही घटना वा-यासारखी पसरली. त्यामुळे विविध चर्चेला उत आला. नाकाबंदी पाहून वरो-याजवळ दरोडेखोर बॅरिकेट्स तोडून पळाल्याचीही चर्चा शहरात रंगत आहे. या दरोड्यात लाखोंचा ऐवज लुटारूंनी लुटला. दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. (माहिती येताच बातमी अपडेट केली जाईल.)
Comments are closed.