बारमधील महिला कामगारसोबत ग्राहकाचे असभ्य वर्तन

वणीतील बारमधली घटना, ग्राहकावर गुन्हा दाखल

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील एका बियर बारमध्ये स्वयंपाक करणाऱ्या महिलेसोबत असभ्य वर्तन व अश्लील शिवीगाळ केल्याच्या तक्रारीवरून एका युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सन्नी केशवानी (45), रा. सिंधी कॉलनी वणी असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. दरम्यान सन्नी केशवानी याने देखील बार मालकाने मारहाण केल्याची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.  

फिर्यादी महिलेनी दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित ही शहरातील जत्रा मैदान रोड वरील एका बियरबारमध्ये स्वयंपाक करण्याचे काम करते. दि. 1 नोव्हे. रोजी रात्री 9.45 वाजता दरम्यान ती बारच्या स्वयंपाक खोलीत स्वयंपाक करीत होती.  दरम्यान एक अनोळखी ग्राहक हातात बियरची बॉटल व ग्लास घेऊन स्वयंपाक खोलीत आला. तसेच त्या ग्राहकाने बियरची बॉटल टेबलवर ठेवून तिला बियर पिती क्या ? अशी विचारणा केली. त्यावर फिर्यादी महीलेनी ही बियर पिण्याची जागा नाही, तुम्ही बाहेर बसा असे सांगितले.

असे म्हणताच तो युवक तिला अश्लील शिवीगाळ करु लागला. तसेच पीडित महिला स्वयंपाक खोलीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना ग्राहकांनी तिला धक्का देऊन खाली पाडले व बियरचे पैसे न देता तो बारच्या बाहेर निघून गेला. घडलेल्या घटनेबाबत बार मॅनेजरने बार मालकाला याबाबत माहिती दिली. तेव्हा बारच्या मालकांनी सदर ग्राहक सन्नी केशवाणी हा ओळखीचा असून त्याचे पैसे माझ्या नावाने लिहून ठेव असे सांगितले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

ग्राहकाचे नाव कळल्याने पीडित महिलेने 2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रारीवरून वणी पोलिसांनी आरोपी सन्नी केशवाणी रा. सिंधी कॉलनी विरुद्ध भादंविच्या कलम 294 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

बार मालकावरही गुन्हा दाखल
दरम्यान सन्नी केशवानी याने बारमालक व आणखी दोघे यांनी बारमध्ये मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, फिर्यादी सन्नी गोलामल केशवानी (40) रा. सिंधी कॉलनी हा 10 हजार रुपये देण्यासाठी बारमध्ये गेला होता. त्यावर बार मालकाने फिर्यादीला तू इथे कसा आलास? अशी विचारणा करत शिविगाळ केली. सोबतच बारमालकासोबत असलेल्या दोघांनी फिर्यादीस पकडले व बार मालकाने मारहाण केली. अशी तक्रार नोंदवली. फिर्यादी सन्नी केशवानीच्या तक्रारीवरून बार मालक व दोन सहका-याविरोधात भादंविच्या कलम 325, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments are closed.